कोल्हापूर प्रतिनिधी | कोरोना संकटाच्या काळात मदतीचे अनेक हात लोकांमधूनच वर येताना दिसत आहेत. इचलकरंजीमधील श्रमशक्ती परिवार हा त्यातीलच एक मजबूत आधार. श्रमशक्ती परिवार गेली अनेक वर्षे श्रमिक, कष्टकरी वर्गाच्या आर्थिक उन्नतीसाठी झटत आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे श्रमिक, कष्टकरी लोकांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. तसेच त्यांचे छोटे-मोठे उद्योग व्यवसाय अडचणीत आलेले आहेत. या सगळ्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी श्रमशक्ती परिवार आपल्या सभासदांना वीस हजार रुपये पासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज स्वरूपी रक्कम विना तारण वाटप करत आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही सभासदाला संस्थेपर्यंत येण्याची गरज नाही. व्हिडीओ कॉलिंगद्वारे कर्जाची आणि संस्थेच्या विमा योजनांची माहिती सभासदांना दिली जात असून ऑनलाईन पद्धतीनेच त्यांना कर्जाचे वाटप केलं जात आहे. गेल्या आठ दिवसात सभासदांना 2500000/- (पंचवीस लाख रुपये) इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने वाटप करण्यात आली आहे.
श्रमशक्ती परिवार
येत्या काळात सभासदांना लघुउद्योग उभे करण्यासाठी लागणारा अर्थपुरवठा करण्याचा मानसदेखील श्रमशक्तीचे चेअरमन कॉ. आप्पा पाटील यांनी बोलून दाखवला. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका ,मदतनीस व ग्रामपंचायत कामगार जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरुध्द लढत आहेत त्यांनासुद्धा गरजेप्रमाणे कर्ज रकमेचे वाटप ऑनलाइन पध्दतीने सुरू करण्यात आलं आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य कष्टकरी श्रमिकांना संकटकाळात हातभार लावण्याचे काम श्रमशक्ती परिवार करत आहे. याचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन श्रमशक्तिचे चेअरमन कॉम्रेड आप्पा पाटील व कार्यकारी संचालिका कॉम्रेड जयश्री पाटील यांनी केले आहे.
मुंबई | केंद्र सरकारने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) प्राधिकरण मुंबईऐवजी गांधीनगर, गुजरात येथे स्थापन करण्यासंबंधी नुकत्याच घेतलेल्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे पवार यांनी IFSC बाबत लक्ष वेधून चिंता व्यक्त केली आहे.
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 3, 2020
सर्व व्यापारी समुदाय, बँकर्स आणि इतर वित्तीय संस्था यांची सर्वसाधारण मानसिकता लक्षात घेता, मुंबईतच एकीकृत प्राधिकरण स्थापित करणे ही स्वाभाविक निवड ठरेल. मात्र उपरोक्त निर्णयामुळे देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराच्या असलेल्या मोक्याच्या स्थानाला व महत्त्वाला धक्का देण्याची भूमिका घेतली गेली आहे. जगभरातील अनेक वित्तीय संस्थासुद्धा या धक्कादायक निर्णयामुळे मागे हटतील आे पवार यांनी म्हटले आहे. तसेच, आयएफएससी मुंबईतच स्थापण्याचा आधीचा निर्णय योग्य का होता, यासंदर्भातली आकडेवारी मी येथे देत असून मा. पंतप्रधानांनी अंतिम निर्णयाप्रत येण्याआधी या सांख्यिकीची पुष्टी करावी अशी विनंती पवार यांनी केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २३ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय बँकिंग क्षेत्राकडे रु. १४५ लाख कोटींच्या ठेवी आहेत. या ठेवींमध्ये एकट्या महाराष्ट्र राज्याचा वाटा २२.८ टक्के आहे, त्याखालोखाल दिल्ली (१० टक्के), उत्तर प्रदेश (७.८ टक्के), कर्नाटक (७.२ टक्के) आणि गुजरात (५.४ टक्के). प्रत्येक बँकेला गव्हर्मेंट सिक्युरिटीजच्या स्वरूपात (G-sec) आपल्या ठेवींच्या १८ टक्के इतका एसएलआर राखीव म्हणून टिकवावा लागतो. या G-sec माध्यमातून केंद्र सरकारला रु. २६ लाख कोटी एवढा निधी प्राप्त होतो. पैकी एकट्या महाराष्ट्राचे योगदान ५ लाख ९५ हजार कोटींचे आहे तर गुजरातचे अवघे १ लाख ४० हजार कोटी अशी माहिती पवार यांनी दिली आहे.
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 3, 2020
G-sec मध्ये महाराष्ट्राचे अपार योगदान असूनही, गुजरातमध्ये आयएफएससी स्थापण्याचा निर्णय आत्यंतिक वाईट, अयोग्य व अनावश्यक आहे. आर्थिक संस्था व व्यावसायिक घराण्यांना महाराष्ट्रापासून अलग करण्याचे हे प्रयत्न असल्याचे संकेत यामुळे जातील व त्यातून अनावश्यक राजकीय अस्थिरता निर्माण होईल. या घटनाक्रमातून देशाचे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर मुंबईची पत कमी झाल्यामुळे एकूणच देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर अपकीर्ती होईल. जागतिक वित्तीय उलाढालीत मुंबई हे जगातील अव्वल दहा वाणिज्य शहरांमध्ये गणलं जातं. मुंबई भारताच्या जीडीपीच्या ६.१६ टक्के आणि भारतीय औद्योगिक उत्पादनात २५ टक्के तर भांडवली व्यवहारातला ७० टक्के वाटा उचलते. मुंबई शहरात महत्वाच्या वित्तीय संस्था आणि असंख्य कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालये असून या व्यवसायातील संधी जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करतात असे पवार सदर पत्रात म्हटले आहे.
मुंबई देशाची आर्थिक, वित्तीय व व्यावसायिक राजधानी असल्या कारणाने आयएफएससी प्राधिकरण या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील सर्व वित्तीय सेवांचे नियमन करण्यासाठी मुंबई हाच सर्वोत्तम पर्याय आहे. म्हणूनच मी पंतप्रधानांना गुजरातमध्ये आयएफएससी स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंती याद्वारे शरद पवार यांनी केली आहे. मा. पंतप्रधान राज्यस्तरीय राजकारण बाजूला ठेवून तार्किक व न्याय्य निर्णय घेतील व राष्ट्रीय मुद्द्याला महत्त्व देतील अशी अपेक्षा व्यक्त करत मला आशा आहे की माझ्या ह्या पत्रातील भूमिका व भावना समजून घेतली जाईल व आयआयएफएससी प्राधिकरणाची स्थापना भारताच्या आर्थिक राजधानीत म्हणजे मुंबईतच करण्याचा निर्णय घेतला जाईल असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
साताऱ्यात कोरोना विषाणूने मागील ३ दिवसांत थैमान घातलं आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७७ वर गेला असून कराडमधील रुग्णसंख्या आता साठीच्या घरात पोहचली आहे. रविवारच्या ताज्या आकडेवारीनुसार जिल्हा कारागृहातील आणखी दोन कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ७७ वर पोहचला आहे.
तरडगाव येथील एका लहान मुलालाही कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. जिह्यातील ५ कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. साताऱ्यातील कराड भागात संचारबंदीचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. कराडपाठोपाठ आता सातारा शहर, फलटण आणि जिल्हा कारागृह येथील रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलं आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनी घरातच राहण्याचं आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे.
हिंदी सिनेसृष्टीत तब्बल ५० वर्षे १०० हुन अधिक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनांवर राज्य करणारा अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बॉलिवूडचा रोमँटिक चॉकलेट बॉय म्हणून आपली ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणजे ऋषी कपूर. हिंदी चित्रपटसृष्टिवर प्रेम करणाऱ्या सगळ्या चाहत्यांना मागील आठवड्यात सलग दोन मोठे आणि अनपेक्षित धक्के पचवावे लागले. लागोपाठ दोन सुपरस्टार्सना या चित्रपट जगताने गमावलंय. इरफान खानच्या अचानकपणे आपल्यातून निघून जाण्याचा धक्का अजूनही काही प्रेक्षकांना सहन करता आला न्हवता की तितक्यात ऋषी कपूर या अभिनेत्यालासुद्धा आपण गमावल्याची बातमी समोर आली. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर एक वर्ष परदेशात राहुन, तिथे उपचार घेऊन ऋषी कपूर मुंबईत परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये दोनवेळा इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन ते पुन्हा घरी गेले होते. परंतु आज सकाळी मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 1970 ते 2020 असा प्रदीर्घ काळ ऋषी कपूर आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकत राहिले आणि बॉक्स ऑफिसवरसुद्धा धुमाकूळ घालत राहिले.
तरुणाईच्या गळ्यातील ताईत – ऋषी कपूर १९८० च्या दशकात
इट्स कपूर अँड सन्स – 1952 साली चेंबूर येथे ऋषी कपूर यांचा जन्म झाला. भारतीय चित्रपट सृष्टीतील “द ग्रेट शोमॅन” म्हणून प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांचे सुपुत्र म्हणजेच ऋषी कपूर. आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते वडील राज कपूर, काका शम्मी कपूर व शशी कपूर, भाऊ रणधीर कपूर व राजीव कपूर अश्या अभिनय क्षेत्रातच काम करणाऱ्या कुटुंबाचा – अभिनयाचा आणि लोकांचे मनोरंजन करण्याचा वारसा ऋषी कपूर यांनी अविरतपणे चालवला. ऋषी कपूर यांचा सुपुत्र असलेला तरुणाईचा लाडका रणबीर कपूरसुद्धा ही परंपरा पुढे चालवतो आहे.
ऋषी कपूर – एका धीरगंभीर मुद्रेत
ओळखीचा प्रवास – ऋषी कपूर यांची मोठ्या पडद्यावर एंट्री खरं तर वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी झाली. वडील राज कपूर यांच्या “श्री 420” या चित्रपटातील “प्यार हुआ, इकरार हुआ” या सुप्रसिद्ध गाण्यात दिसणारा बालकलाकार म्हणजे ऋषी कपूर. यानंतर 1970 मध्ये “मेरा नाम जोकर” या राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातून ऋषी कपूर झळकले. खऱ्या अर्थाने ऋषी कपूर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली तो चित्रपट म्हणजे “बॉबी.” 1973 मध्ये रिलीज झालेला डिंपल कपाडिया या अभिनेत्री सोबत केलेला हा सिनेमा म्हणजे आजच्या पिढीलासुद्धा रोमँटिकपणा अनुभवायला लावणारा एव्हरग्रीन सिनेमा. या सिनेमाच्या अनुषंगाने एका मुलाखतीत बोलताना ऋषी कपूर यांनी एक आठवण सांगितली होती. ते म्हणाले होते की, “बॉबी सिनेमाबद्दल खरं तर अनेकांचा गैरसमज असा आहे की हा सिनेमा माझ्या वडिलांनी मला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी दिग्दर्शित केला. पण सत्य असं होतं की या सिनेमामध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांना नवयुवकाची प्रेमकथा रंगवायची होती आणि त्यावेळी राजेश खन्नाला भूमिका देण्याइतपत पैसे त्यांच्याकडे नसल्याने ही भूमिका मला मिळाली.” बॉबी हा सिनेमा भारतातील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे..!! यातील भूमिकेसाठी ऋषी कपूर यांना त्यांच्या आयुष्यातील पहिले Filmfare Best Actor Award मिळाले. या नंतर 1970 च्या दशकात ते अनेक हलक्या-फुलक्या विनोदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि यातले सगळेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले.
ऋषी कपूर – हे बॉलिवूडच्या इतिहासातील सोनेरी पानच आहे.
1975 मध्ये नीतू सिंग सोबतचा ‘रफू चक्कर’, 1977 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘अमर, अकबर, अंथनी’ आणि झीनत अमान यांच्यासोबत ‘खेल खेल मे’ (1975) व ‘हम किसींसे कम नहीं’ (1977) अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून ऋषी कपूर प्रेक्षकांचे लाडके “चॉकलेट हिरो” बनत गेले. नितु सिंग यांच्यासोबत 1980 मध्ये त्यांनी विवाह केला. आजतागायत ही जोडी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय करताना दिसून आली. या दोघांचा एकत्रित अभिनय केलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘जेहरीला इंसान’ जो 1974 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘कभी कभी’ आणि ‘दुसरा आदमी’ अशा चित्रपटांत त्यांनी काम केलं. 1973 ते 2000 दरम्यान लगातार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात ऋषी कपूर यशस्वी ठरले. “राजा” (1975), “लैला मजनू”(1976), “सरगम”(1979), “प्रेम रोग” (1982), “कुली”(1983), “सागर” (1985),”चांदनी” (1989), “बोल राधा बोल” (1992), “दामिनी”(1993), “कारोबार” (1999) असे असंख्य ब्लॉकबस्टर चित्रपट ऋषी कपूर यांच्या भूमिकेमुळे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. याच दरम्यान 2000 मध्ये त्यांनी “आ अब लौट चले” या चित्रपटातुन दिग्दर्शन क्षेत्रातसुद्धा पदार्पण केलं.
हॅप्पी हेअरस्टाईल कटवाले चॉकलेट बॉय – ऋषी कपूर
अनोळखी प्रवास – ऋषी कपूर यांच्या एकूण करिअरमधले अजून दोन महत्वाचे सिनेमे जे त्यांनी अगदी सुरुवातीच्या काळात केले ज्यांचा उल्लेख फारसा केला जात नाही ते म्हणजे “कर्ज” (1980) आणि “एक चादर मैली सी”(1986). सुभाष घाई यांनी दिग्दर्शित केलेला कर्ज हा थ्रीलर प्रकारातील सिनेमा जो बॉक्स ऑफीसवर फारसा यशस्वी ठरू शकला नाही. परंतु नंतर मात्र यातील ऋषी कपूर यांच्या भूमिकेमुळे हा चित्रपट बराच चर्चेत राहिला. “एक चादर मैली सी” हा राजेंद्र सिंग बेदी यांच्या कादंबरीवर आधारित एक वेगळ्या धाटणीचा आणि दुर्लक्षित विषयावर लक्ष वेधून घेणारा चित्रपट म्हणून चर्चेत राहिला. 2000 नंतरच्या काही वर्षांमध्ये ऋषी कपूर हे प्रमुख भूमिकेतुन सहाय्यक अभिनेता या भूमिकेत बॉलिवूडमध्ये दिसू लागले. “हम तुम”, “फना”, “नमस्ते लंडन”, “लव्ह आज-कल”, “दिल्ली -6” अश्या चित्रपटांमधून त्यांनी हलक्या फुलक्या भूमिका साकारत प्रेक्षकांवर आपली मोहिनी टाकली. 2007 मध्ये “Don’t Stop Dreaming” या आदित्य राज कपूर दिग्दर्शित इंग्रजी चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. 2011 मधील “दो दुनी चार” या चित्रपटात, एका मध्यमवर्गीय धडपडणाऱ्या बापाच्या भूमिकेत ते दिसून आले. याच भूमिकेसाठी त्यांना Filmfare Critic Award For Best Actor देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 2012 मध्ये “अग्निपथ” या सिनेमामध्ये “रौफ लाला” ही ऋषी कपूर यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका अजरामर ठरली. याच वर्षी Student Of The Year या चित्रपटातसुद्धा ते सहाय्यक अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच “Housfull-2” या चित्रपटातुन ऋषी कपूर आणि रणधीर कपूर हे दोघे भाऊ एकत्र मोठ्या पडद्यावर झळकले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या “D-Day” या चित्रपटात दाऊद इब्राहिमच्या रोलमध्ये ऋषी कपूर दिसून आले. याच सिनेमामध्ये इरफान खान आणि ऋषी कपूर हे दोन लोकप्रिय अभिनेते एकत्र दिसून आले होते, जे लागोपाठच्या दिवशीच आपल्यातून निघून गेले. 2016 मध्ये “कपूर अँड सन्स” मधील भूमिकेसाठी सुद्धा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला. दरम्यानच्या वर्षात ते “शुद्ध देसी रोमान्स”, “पटियाला हाऊस”, “औरंगजेब”, “बेशरम” , “बेवकुफिया”, “सनम रे”, “चष्मे बद्दूर” अशा अनेक चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसले. 2017 मध्ये परेश रावल आणि ऋषी कपूर हे दोन दिग्गज कलाकार “पटेल की पंजाबी शादी” या चित्रपटात एकत्र दिसले.
दीवाना चित्रपटातील शाहरुख आणि ऋषी कपूर
2018 मध्ये उर्दू लेखक सादत हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारित नंदिता दास लिखित आणि दिग्दर्शित “Manto” या बायोग्राफी प्रकारातील सिनेमामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. 2018 मध्ये Netflix च्या माध्यमातून “राजमा-चावल” घेऊन ते प्रेक्षकांना भेटले. यापुढील काळात तब्बल २० वर्षांनंतर अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे दोन दिग्गज कलाकार “102-Not Out” या चित्रपटातुन एकत्र आले. यामध्ये 102 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्या 76 वर्षीय मुलाच्या भूमिकेत ऋषी कपूर दिसून आले. त्यामुळे हाही सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला. या नंतर “मुल्क” या चित्रपटात त्यांनी अतिशय वेगळी भूमिका साकारली, जी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आणि अभिमान म्हणून नावाजली जाते. भारतामध्ये राहणाऱ्या इमानदार मुस्लिमांची व्यथा सांगणारा, सर्वांच्याच अंगावर काटा उभा करणारा रोल यामध्ये ऋषी कपूर यांनी पार पाडला होता. या नंतर 2019 मध्ये “झूठा कहीं का” आणि ” द बॉडी” या दोन चित्रपटांमध्ये त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका पार पाडली. “द बॉडी” हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट ठरला. याशिवाय हितेश भाटिया दिग्दर्शित “शर्माजी नमकीन” या चित्रपटाचे काम जुही चावला यांच्यासोबत सुरू होते परंतु तो चित्रपट पूर्ण होण्याआधीच त्यांचं निधन झालं.
2008 मध्ये ऋषी कपूर यांना Filmfare Lifetime Achievement Award मिळाला. याशिवाय 2009 मध्ये रशियन सरकारकडून सिनेमा क्षेत्रातील कारकिर्दीसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 2011 मध्ये Zee Cine Awards कडून Best Lifetime Jodi Award हा सन्मान त्यांना नितु सिंग यांच्यासोबत मिळाला. तसेच 2013 मध्ये The Times Of India Film Award हा सन्मान अग्निपथ सिनेमातील रौफ लाला या खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना प्राप्त झाला.
रौफ लालाच्या भूमिकेतील ऋषी कपूर
गाणी आणि ऋषी कपूर – ऋषी कपूर यांची गाणी ऐकण्याबरोबरच पडद्यावर पाहणं ही वेगळीच रिफ्रेशमेंट असते. त्यांची कित्येक गाणी आजच्या पिढीतील तरुणसुद्धा गुणगुणत असतात. ‘पायलिया ओ हो हो हो’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं’, सोचेंगे तुम्हे प्यार, करके नहीं’, ‘सागर जैसी आँखोवाली’, ‘होगा तुमसे प्यारा कोन’, ‘चांदणी’, ‘मैं शायर तो नहीं’, ‘एक मै और एक तु’, ‘ओ हंसिनी’, ‘जीवन के हर मोड पर मिल जाते है हमसफर’, ‘मेरी उमर के नौजवानो’, ‘क्या मौसम है ये दिवाने दिल’, ‘नजरों से कह दो प्यार में मिलने का मौसम आ गया ‘, ‘जब से तुमको देखा है सनम’,’ चुम लो ओठ तेरे दिलकी यही ख्वाइश है ‘,’ तेरे मेरे ओंठो पे मिठे मिठे गीत मितवा’, ‘तु है वहीं…दिलने जिसे अपना कहा’ या आणि अशा एक से बढकर एक रोमँटिक गाण्यांची यादी आठवली की गोबऱ्या गालाचे ऋषी कपूर, त्यांचे रंगीबेरंगी स्वेटर आणि त्यांचा तो रोमँटिक अंदाज डोळ्यांसमोर कायम उभे राहतात.
पत्नी नितु सिंग यांच्यासमवेत एका निवांत क्षणी
खुल्लम-खुल्ला – आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्याबद्दल सगळं काही जाणून घ्यावं असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असतं. एखाद्या चाहत्याच्या आपल्या आवडत्या कलाकाराने लिहिलेल्या आत्मचरित्राकडून ज्या अपेक्षा असतात त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरणारं ऋषी कपूर यांचं आत्मचरित्र म्हणजे खुल्लम-खुल्ला…!! 2017 मध्ये ऋषी कपूर यांचं खुल्लम-खुल्ला हे आत्मचरित्र त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला आलं. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक माणसाबद्दल, घटनेबद्दल आणि अनुभवाबद्दल प्रचंड प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे लिहिल्याचं जाणवतं. त्यांच्या स्वभावातला सच्चेपणा आणि स्पष्टवक्तेपणा त्यांच्या लिखाणातून वाचकांना भिडणारा वाटतो. या पुस्तकातुन त्यांनी कपूर घराण्यातील वातावरण आणि त्यात त्यांची झालेली जडणघडण, त्यांच्यावर झालेले संस्कार, कुटुंबात मिळत गेलेले अभिनयाचे धडे, “मेरा नाम जोकर” चित्रपटात काम करण्यासाठी म्हणून शाळेला दांडी मारणं अशा आपल्या लहानपणापासूनच्या कित्येक आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच आपल्या सुपरहिट गाण्यांनी त्यांनी गाजवलेला काळ, रोमँटिक फिल्म्स वगळता इतर काही हटके फिल्ममध्ये काम करताना आलेले अनुभव आणि किस्से, इतकी वर्षे चित्रपटांमध्ये ज्या वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत भूमिका पार पाडल्या त्यांच्यासोबत असणारे नातेसंबंध, त्याबद्दल होणाऱ्या चर्चा, गॉसिप्स अश्या सगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने लिहिलं गेलेलं हे पुस्तक आहे. आपल्या कामाप्रति असणारं प्रेम, कुटुंब आणि मित्र-मैत्रिणी यांच्यासोबतच्या आठवणी, स्वतःच्या आवडी-निवडी त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. बॉलिवूडमध्ये अलीकडे जरी बरेच नवे कलाकार आपल्याला सामोरे जावे लागलेल्या डिप्रेशनबद्दल खुलेपणाने बोलत असले तरी त्या काळातील ज्येष्ठ कलाकाराने आपल्याला आलेल्या डिप्रेशनबद्दल इतक्या वर्षांनी खुलेपणाने सांगणं असं उदाहरण दुर्मिळ वाटतं. या पुस्तकात ऋषी कपूर यांनी जेव्हा प्रमुख भूमिका मिळत न्हवत्या त्या काळामध्ये आपल्याला आलेल्या डिप्रेशनबद्दलसुद्धा स्पष्ट लिहिलेलं आहे. अशा अनेक कारणांमुळे आजवर भारतीय कलाकारांच्या आत्मचरित्रांपैकी सर्वोत्तम आणि आपल्या प्रेक्षकांसाठी अगदी “दिल से” लिहिलं गेलेलं आत्मचरित्र म्हणून ऋषी कपूर यांचं “खुल्लम-खुल्ला” हे पुस्तक नावाजलं जातं..!!!
ऋषी कपूर यांचं आत्मचरित्र – खुल्लम खुल्ला
अलविदा ऋषीदा – निवांत, सदा हसतमुख, फ्रेश, विनोदी, खेळकर अशा हलक्या-फुलक्या भूमिकांमधून ते सातत्याने प्रेक्षकांना भेटत राहिले. प्रेक्षकांचं मनोरंजन करणे, त्यांना हसवत राहणे आणि चित्रपट पाहून सिनेमगृहातून बाहेर पडत असताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवणे..!! हे काम जवळपास ५० वर्षं ऋषीदांनी केलं. आणि कदाचित म्हणूनच या ५० वर्षांच्या काळात ऋषी कपूर यांनी मोठ्या पडद्याच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांच्या मनात असं स्वतःचं स्थान निर्माण केलं, ज्या स्थानी इतर कुणीही येऊ शकणार नाही. ऋषी कपूर यांचं अस्तित्व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी या क्षणापर्यंत हवंहवंस वाटतंय. त्यांच्या असंख्य चाहत्यांशी असणारं इतकं घट्ट आणि अतूट नातं ऋषी कपूर शेवटच्या क्षणापर्यंत जपत राहिले. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या फॅन्सच्या मनातील त्यांच्या स्थानाची पोकळी भरुन निघणे आता अशक्यच..
डी-डे मधील दोन कलाकारांचा हा भावनिक क्षण
रुपेरी पडद्यावरील हा विनोदी आणि कमालीचा रोमँटिक माणूस आणखी काही काळ आपल्या सोबत हवा होता असं मनोमन प्रत्येकालाच वाटतंय. माझ्या पिढीचं म्हणाल तर एकत्र कुटुंबातील काका आणि आजोबांसारखी माणसं अचानक शांत होतात, तेव्हा घर जसं खायला उठतं तसंच वातावरण सध्या कोरोनाकाळात इरफान खान आणि ऋषी कपूर या सच्च्या कलाकारांच्या जाण्यामुळं झालं आहे. ऋषी कपूर यांच्या रूपाने लाभलेल्या बिनधास्त आणि जॉली व्यक्तिमत्त्वाला गमावल्याचं दुःख दीर्घकाळ सोबत राहील..लव्ह यू प्रेमरोगी ऋषीदा, मिस यू अ लॉट..!!
लेखिका या मानसशास्त्र विषयातील पदवीधर असून त्यांना वाचन, लिखाण आणि प्रवासाची विशेष आवड आहे. संविधानिक मूल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, वयात येताना आणि जोडीदाराची विवेकी निवड या विषयांवर त्या मुक्त संवादही घेतात. त्यांचा संपर्क क्रमांक – 8408877063
मुंबई । राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण ७९० नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता १२ हजार २९६ वर पोहोचली आहे. मुंबई, पुण्यासह आणखी काही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आज एकाच दिवसात करोनामुळे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात २१ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत राज्यात २००० रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच ९७७५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आज ३६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या आता ५२१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमधील २७, पुणे शहरातील ३, अमरावती शहरातील २, तर वसई विरारमधील १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा आकडेवारी ( कंसात एकूण मृतांची संख्या)
ठाणे मंडळ
मुंबई महानगरपालिका: ८३५ (३२२)
ठाणे: ५७ (२)
ठाणे मनपा: ४६७ (७)
नवी मुंबई मनपा: २०४ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १९५ (३)
उल्हासनगर मनपा: ४
भिवंडी निजामपूर मनपा: २० (१)
मीरा भाईंदर मनपा: १३९ (२)
पालघर: ४४ (१)
वसई विरार मनपा: १४४ (४)
रायगड: २७ (१)
पनवेल मनपा: ४९ (२)
नाशिक मंडळ
नाशिक: ८
नाशिक मनपा: ३५
मालेगाव मनपा: २१९ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: १९ (१)
जळगाव: ३४ (११)
जळगाव मनपा: १२ (१)
नंदूरबार: १२ (१)
पुणे मंडळ
पुणे:८० (४)
पुणे मनपा: ११८७ (९५)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: १०८ (६)
सातारा: ३६ (२)
कोल्हापूर मंडळ
कोल्हापूर: १०
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: २९
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: ३ (१)
रत्नागिरी: १० (१)
औरंगाबाद मंडळ
औरंगाबाद:५
औरंगाबाद मनपा: २१५ (९)
जालना: ८
हिंगोली: ३७
परभणी: १ (१)
परभणी मनपा: २
लातूर मंडळ
लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ४
अकोला मंडळ
अकोला: १२ (१)
अकोला मनपा: ३७
अमरावती: ३ (१)
अमरावती मनपा: २८ (९)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २
नागपूर मंडळ
नागपूर: ६
नागपूर मनपा: १४० (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
वर्तमानकालीन कोरोना वैश्विक संकटाने जग, भारत आणि महाराष्ट्राला ग्रासून टाकले आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि जनसहभागातून कोरोनाचं संकट परतावून लावण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या संकटाने आपणा सर्वांना दिलेला प्रतिबंधक सुरक्षितता उपाय म्हणजे घरी राहणे आणि शारिरीक अंतर जोपासणे हा आहे. या संकाटाने अनेक व्यवस्थांच्या व्यवस्थापनात्मक चौकटी बदलल्या आहेत. यातील एक म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. यंदाच्या वर्षी महाविद्यालयीन पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा या विलंबाने होणार आहेत. माझ्या मते या संकटाने आपल्याला विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षा पद्धती नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या आधारे घेण्याची गरज निर्माण केली आहे. हे करत असताना आजचा महाविद्यालयीन विद्यार्थी हा परीक्षार्थी न राहता संशोधक विद्यार्थी म्हणून नावारूपास यावा हा विचार करुन पुढील उपाययोजनांचा विचार करणे आवश्यक आहे.
०१. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून संशोधन पुस्तिका तयार होणे – यामध्ये अकृषी विद्यापीठांत-महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी हा संशोधक विद्यार्थी म्हणून नावारूपास येण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी संशोधन पुस्तिकेचे निर्मिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक प्राध्यापकांनी संशोधनाविषयी मार्गदर्शन करून सदर पुस्तिकेचे विद्यापीठाकडून मानांकन व्हावे विद्यार्थी संशोधन पुस्तिकेचा वापर हा शासन स्तरावरील धोरण निर्मिती व निश्चितीसाठी सहाय्यकारी घटक म्हणून करण्यात यावा.
०२. टास्क ओरिएंटेड एक्झाम सिस्टमचा अंमल करणे – यामध्ये कार्यभिमुख परीक्षा प्रणालीचा वापर होऊन वर्तमानकालीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे धोरण निर्मिती व धोरण निश्चितीसाठी कसे परिपूर्ण होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये आपणाला “चॉइस बेस्ड टास्क सिस्टम” चा वापर करून विद्यार्थ्याला तो शिकत असणाऱ्या अभ्यासशाखेआधारे कार्यपद्धत निवडण्याची मुभा प्राप्त व्हावी. सदर अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठस्तरीय विविध विषयांचा अभ्यास शाखांचा वापर होऊन विद्यार्थ्याने आपल्या आकलनाद्वारे कार्यपद्धती अंमल करणे गरजेचे आहे. याचाच दुसरा भाग म्हणजे विद्यार्थ्यांना कार्यपद्धती पूर्ण करताना स्वातंत्र्य देण्यात यावे, म्हणजे उदाहरणार्थ जर शिवाजी विद्यापीठाचा पदवी घेणारा विद्यार्थी राज्यशास्त्र विषयासंबंधी आपले संशोधनपर कार्य मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या अभ्यासक्रमाशी संलग्नित होऊन करणार असेल तर त्यास मुभा देण्यात यावी.
०३. लिंक बेस्ड क्वेशन बँक सिस्टम आणि क्विक रिझल्ट प्रणालीचा अवलंब करणे – या प्रणालीद्वारे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यापीठांनी पदवी स्तरासाठी 50 गुण, पदव्युत्तर पदवीसाठी 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नावली परीक्षा ही लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ई-मेल अथवा व्हाट्सअप नंबर वर ती पाठवून मर्यादित वेळेत ही परीक्षा घेऊन याचा निकाल तात्काळ जाहीर करावा.
०४. स्टुडंट रिसर्च ओरिएंटेशन ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंमलबजावणीद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे – म्हणजेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी लिंक तयार करून यासाठी यासाठी वेळ वेळ निश्चित करून पीआरएन नंबर आणि ओटीपी देऊन प्रश्नावली सोडविण्यास संदर्भात सूचित करावे. सर्व विद्यापीठांच्या महाविद्यालयांनी परीक्षा घेताना एक्झाम पोर्टलची निर्मिती करावी. यानुसार परीक्षांचे नियंत्रण व नियोजन करण्यात यावे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या या ऑनलाईन परीक्षेमुळे गुणदान करणे व त्वरित निकाल जाहीर करणे सोपे होऊन एकत्रित निकाल विद्यापीठास पाठविण्यात येणं सुलभ होईल.
०५. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला महाविद्यालय प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन होऊन त्याच्या संशोधनपर जाणिवांचा विकास होण्यासाठी महाविद्यालयीन ‘संशोधक विद्यार्थी अभ्यास गट’ स्थापन होणे गरजेचे आहे. – यामध्ये प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी पदवी व पदव्युत्तर रिसर्च ओरिएंटेड प्रोग्रामच्या प्रशिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना संशोधन पद्धती काय असते? संशोधन कशा पद्धतीने करावे? संशोधनात नाविन्यता कशी येईल? यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. म्हणजेच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटिव्ह अॕप्लायड रिसोर्सेसचा वापर करून प्रशिक्षण देणे यात अभिप्रेत आहे. पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना शब्दमर्यादा संशोधन पद्धती या संशोधनामध्ये काय गोष्टी अपेक्षित आहेत. अभ्यासक्रमांतून संशोधनासाठी काय करता येईल आणि अभ्यासक्रमातील घटकांचा धोरण निश्चिती व निर्मितीसाठी कसा वापर करता येईल यासाठी प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रशिक्षित करत असताना आपण करत असलेले संशोधन हे शासन-प्रशासन स्तरावर कसे फायद्याचे ठरेल आणि आपल्या संकल्पना या किती ताकदीच्या असाव्यात यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. या संशोधनामध्ये वाड़्मयचौर्यता नसावी. केलेले संशोधन हे किती मार्गदर्शक ठरेल याची तयारी लेखणीतून होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे.
वर उल्लेख केलेल्या पद्धती ही पारंपरिक पद्धतीला पर्याय नक्कीच होऊ शकतात. थोडक्यात वर्तमानकालीन नावीन्यपूर्ण संकल्पना आणि दूरगामी उपाययोजना असंच या संकल्पनेबाबत म्हणता येईल.
०१. परंपरागत परीक्षा पद्धतीला टास्क ओरिएंटेड एक्झाम सिस्टम हा एक सकारात्मक पर्याय आहे.
०२. विद्यार्थ्यांना संशोधक होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण होय.
०३. शासन-प्रशासन आणि राजकारण या क्षेत्रातील धोरण निश्चिती आणि निर्मितीच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे.
०४.आजचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी हे टेक्नोसॅव्ही म्हणजेच तंत्रज्ञान जाणकार असून परंपरागत परीक्षापद्धती ऐवजी त्यांच्या संशोधनपर जाणिवांचा विकास होण्यासाठी टेक्नोसॅव्ही रिसर्चर तयार करणारी ही पद्धती आहे.
०५. आपण काय शिकलो, याऐवजी का आणि कशासाठी शिकतोय या शिक्षणाचा उपयोजन आणि सर्जनशीलतेसाठी कशा पद्धतीने वापर करण्यात येतोय याची माहिती विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पनेतून देनं गरजेचे आहे.
०६. विद्यापीठांनी कालबाह्य अभ्यासक्रमांना पूर्णतः बंद करून नाविन्यता असलेल्या अभ्यासक्रमांचा अंमल करणे गरजेचे आहे.
०७. परीक्षा नुसत्या पात्रतेच्या धनी न होता क्षमतेच्या सारथी व्हाव्यात. यातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास होणे आवश्यक आहे.
०८. महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनींना महाविद्यालय स्तरावरूनच नीतिमूल्यांचं शिक्षण मिळालं तर त्यांच्या वैचारिक क्षमता अधिक प्रगल्भ होऊन ते एक जबाबदार आणि सुजाण नागरिक होतील.
०९. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना फक्त परीक्षापद्धतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या नवसंकल्पना, संशोधन अभ्यास पद्धतीद्वारे व्यापक आणि भविष्यासाठी कालसुसंगत बनवणे हे वर्तमान परिस्थितीत गरजेचं बनलं आहे. यासाठीच कालबाह्य अभ्यासक्रम किंवा परंपरागत परीक्षा पद्धतीचा टप्प्याटप्प्याने ऱ्हास होऊन नावीन्यपूर्ण संकल्पनेला संधी देणे गरजेचे आहे.
विशेष विनंती – महाराष्ट्रातील बहुतांशी महाविद्यालयात इंटरनेटची सुविधा किंवा वेबसाईट नसली तरी या व्यवस्था उभ्या करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने या नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा सौजन्यपूर्ण विचार करून या नवीन बदलासाठी मी आणि माझ्यासारख्या इतर सहकार्यांना केव्हाही मदतीची हाक द्यावी.
महत्त्वाचे निवेदन – वरील सर्व उपाययोजनांसंदर्भात अनेकांची सहमती किंवा असहमती असू शकते. माझ्या आकलनानुसार शैक्षणिक बदलांचा विचार करून या वर्तमानकालीन उपाययोजना महाराष्ट्र व भारतातील तमाम शैक्षणिक संस्थांसाठी मी विचाराधीन ठेवल्या आहेत. आपल्या मतमतांतरांचंही स्वागतच आहे. खाली दिलेल्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर आपल्या सूचना कळवाव्यात. आपल्या सर्व सूचनांचं स्वागतच..!!
नवी दिल्ली । करोनाचा प्रसार वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही तर १७ मे पर्यंतचा लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. लॉकडाउनमुळेच आपण कोरोनाला हरवू शकतो. लोकांनी घरी राहून लॉकडाउनचे नियम पाळावे. गर्दी टाळावी असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे.
दरम्यान, भारतात लॉकडाऊन योग्य वेळी लागू केल्यानं मोठी जीवितहानी टळली असल्याचंही आठवले म्हणाले.” कोरोनाने जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात ३४ लाख लोक करोनाबाधित झाले आहेत. भारतात कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार इतकी झाली आहे. महाराष्ट्रात १२ हजार ५०० लोकांना करोनाची लगाण झाली आहे. जगात गो कोरोना चा आम्ही नारा दिला. मात्र करोना काही जात नाही. महाराष्ट्रात ५०० पेक्षा जास्त लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाउन वेळेवर केला नसता तर देशात लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असता,” असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन केला. त्यानंतर १४ एप्रिल ते ३ मे पर्यंत लॉकडाउन केला. आता तिसऱ्यांदा १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”
प्रत्येकजण सामाजिक अलगावमधून कोरोना विषाणूशी लढत असल्याने संचारबंदीमध्ये आहे. यावर्षी कामगार दिन फेरी, उत्सव किंवा मेळावे नाहीत. तरीसुद्धा काय गमावले आहे आणि भविष्यात काय मिळणार आहे हे सांगण्याचा दिवस आहे. हे वर्ष कामगारांसाठी वेदनादायी आहे. या जागतिक साथीमुळे जग उलटसुलट झाले आहे. भारतातील कोट्यवधी कामगारांसाठी खूप वाईट परिस्थिती उद्भवली आहे. ज्यांना कुटुंब, अन्न आणि मानसिक शांतता मागे ठेवून शिबिरे किंवा छावणीत राहण्यास भाग पाडले गेले. त्यांना कधीही शारीरिक अंतराची सुरक्षा मिळणार नाही, हे त्यांच्या बलिदानानंतर सांगणे खूप उपहासात्मक आहे. जरी प्रगती होण्यासाठी कामगार मोठे योगदान देत असले तरी कामगारांनी आता स्वतःच्या प्रगतीचे हक्क गमावले आहेत. केंद्र सरकारने परदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी अनेक अटींसहित, परतीच्या सुलभतेसाठी राज्यांकडे विनवण्या करत खूप काही केले होते. म्हणूनच घरी परत जाण्यासाठी कामगार १ मे ची वाट बघत होते. ज्यांना या वृद्धीचा सर्वाधिक फायदा झाला ते मानवी अटींऐवजी हे कार्यबल उपयोगितावादामध्ये (स्वतःला काय मिळणार) पाहतात.
भारताला आवश्यक असणारे नवे व्यवहार मुक्त, वाढीव रोजगाराची हमी देणारे आणि किमान वेतन केंद्रस्थानी असणारे असे आवश्यक आहेत.
निखील डे, अरुणा रॉय
विशेषाधिकारीत लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, जर त्यांना कामगारांच्या दुर्बलता आणि असुरक्षिततेचा त्यांच्यावर काही परिणाम होऊ द्यायचा नसेल, तर किमान त्यांच्या जीवनमानाची सुरक्षितता ही कामगार, शेतकरी आणि अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना दिली पाहिजे. एका प्रचंड मानवतावादी संकटाला दूर शुभेच्छा देऊन या covid-१९ च्या या प्रसारावर लढा देण्याचे खूप वाईट तंत्र आहे. सर्व भारतीयांना काही प्रमाणात उपजीविका आणि उत्पन्नाची हमी देण्याचा हा उपाय आहे. या साथीला मानवी प्रतिसाद म्हणून हा आदेश सृजनशील आणि विस्तारित रोजगार हमी म्हणून पूर्ण करता येऊ शकेल. बहुतेक देशांनी त्यांच्या जीडीपीच्या १०% आणि अधिक पुनर्प्राप्ती संकुले एकत्र ठेवली आहेत.
भारताने अस्तित्वात असणाऱ्या काही लाभांचे पुन्हा पॅकेजिंग केले आहे, ज्यामध्ये जीडीपीच्या १% अंश जोडला आहे आणि सर्व नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी सहकार्य केल्याचे दर्शविले आहे. तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत ६ आठवड्यांची संचारबंदी लादली आहे. सर्व पीडितांना रोख रकमेचा प्रवाह मिळवून देण्याशिवाय पर्याय नाही. रोख हस्तांतरणाविरुद्धचा कायदा म्हणजे विस्तारित रोजगार हमी कायदा आहे. यामध्ये कामाच्या बदल्यात शिधा देता येऊ शकतोय. अनुदानित अन्नधान्याच्या मजुरीची काही भाग रक्कम ही आपल्या अनौपचारिक क्षेत्रातील ९४% कामगारांसाठी आदर्श ठरेल. हे आपल्याला सन्मानासह काम देईल आणि कदाचित एक तुटलेली अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्याचा हा एक स्वस्त मार्ग असेल. हाती घेतलेल्या रोजगार हमीच्या उपायांकडे आपण कल्पकतेने पाहूया.
सर्वप्रथम, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) विद्यमान हक्कांना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मागणीनुसार कामाची हमी असणे आवश्यक आहे. सरकारने सरावातून खासगी क्षेत्राला स्वतःचे मागदर्शन केले पाहिजे आणि संचारबंदीदरम्यान मनरेगाचा निधी वापरून नोकरीच्या सर्व कार्डधारकांना पूर्ण वेतन दिले पाहिजे. उपजीविकेची सुरक्षितता देण्यासाठी केलेल्या कायद्यांतर्गत संचारबंदीद्वारे कामगारांना घरात राहण्याच्या कठोर आदेशासह बंधने घालण्यात आली होती. ज्यामध्ये मनरेगाच्या कामगारांना कोणतीच सूट नव्हती. जर राज्य काम देऊ शकत नसेल तर या कायद्याने अगदी बेरोजगारी भत्त्याची सोय केली आहे. १० करोड कुटुंबांच्या माध्यमातून मनरेगाने ग्रामीण पायाभूत सुविधांची बांधणी करण्यास मदत केली आहे. परंतु संसाधनांच्या अडचणींमुळे बरेच जण १०० दिवसांच्या कामाच्या हक्कांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. कोणत्याही आपत्तीत मनरेगाचे काम आणखी ५० दिवस वाढविण्याची तरतूद सरकारकडे अस्तित्वात आहे. रोजगार हमी कायदा विस्तारित करणे आवश्यक आहे, म्हणूनच हे धोरण प्रभावी आणि मुक्तअंत झाले पाहिजे. covid च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी या कालावधीत कितीही दिवस काम करण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही प्रौढ व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कुटुंबाचे १०० दिवस वाढविणे आवश्यक आहे.
वस्तुतः शहरी रोजगाराची हमी देखील दिली पाहिजे. संचारबंदीचा धक्का आणि रोजगाराचे नुकसान केवळ उत्पन्न पुन्हा सुरु करण्याच्या खात्रीसाठी काळ आणि सुरक्षितता यांची हमी देण्यासाठी व्यवहार्य असेल. अगदी विविध उद्योगातील बऱ्याच प्रासंगिक आणि कायमस्वरूपी कामगारांना युद्धपातळीवर कामाची आवश्यकता असेल. जे पुरेशा सुरक्षा उपायांसह चालू ठेवणे आवश्यक आहेत, अशा नियमित सार्वजनिक कामांव्यतिरिक्त विस्तारित रोजगार हमी कायद्यामध्ये घरातून होणाऱ्या कामांना या श्रेणीतील कामगारांना घरातून काम करण्यास सक्षम करण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे. त्यांच्या स्वतःच्या शेतातील आणि स्वयंपाकघराच्या बागेतील कामगारांचा वापर उत्पादन वाढविण्यास करता येऊ शकतो. मास्क, सॅनिटायझर आणि साबण बनविण्यासारख्या निवडक सेवा आणि उत्पादनक्षमता covid -१९ च्या आव्हानाला सामोरे जाण्यास मदत करतील.
केरळच्या यशाचे अनुकरण करत पंचायत आणि स्थानिक सरकार यांना सबळ करणे आणि या साथीच्या आव्हानाला सामोरे जाण्याच्या कामात सामील करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये विस्तारित रोजगार हमीच्या कार्यक्रमांतर्गत covid -१९ च्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी भरीव कामगार दलाद्वारे संसाधने आणि लवचिकता दिली जाईल. वृद्ध आणि असुरक्षित लोकांना तीव्र धोका आहे. शाळाबाह्य मुलांना मोठ्या प्रमाणात कुपोषणाचा सामना करावा लागतो आहे. सावधगिरी बाळगणाऱ्या कामगारांचा उपयोग गरजुंना अन्न आणि काळजीच्या सुविधा पुरविण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.
या स्वरूपाचे बजेट कसे असेल? पैसे कुठून येतील? १९७५ मध्ये लोक आणि दिवस यावर कोणतीच बंधने न घालता महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी कायदा पास केला होता. या कायद्याच्या निधीसाठी विधानसभेने चार कर निवडले: १. सर्व पगारधारकांसाठी व्यावसायिक कर २. पेट्रोलवरील कर ३. विक्री कर अधिभार ४. तीन पीकं सिंचनाखाली असलेल्या शेतीउत्पन्नावरील कर. हे चार कर रोजगार हमी कायद्यासाठी समर्पित ठेवले गेले आहेत. परिणामी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्राकडे नेहमी पुरेसे पैसे होते. अनुभवाने असे दर्शविले जाते की जेव्हा इतर कामांच्या संधी कमी होत जातात, तेव्हा किमान वेतनात ८ तास काम केले जाईल आणि जेव्हा अर्थव्यवस्था सुधारेल तेव्हा कामगार कामाची मागणी करतील. महाराष्ट्राने ३० वर्षानंतर अधिनियमित केलेल्या नरेगासाठी एक मॉडेल दिले होते. तथापि त्याची निधीची पद्धत मनरेगाद्वारे अवलंबिली गेली आणि परिणामी तो नेहमीच कमी होत गेला आहे. हे मागणी-संचालित होण्याचे अनन्य कायदेशीर स्थापत्य असूनही बजेटपुरते मर्यादित नाही. या रिकव्हरी पॅकेजमध्ये विशेष आपत्ती व्यवस्थापन रोजगार हमी कार्यक्रम जोडण्यासाठी समर्पित करांचा संच असणे गरजेचे आहे. कदाचित आपण १ किंवा २% संपत्ती कराने सुरुवात करू शकतो म्हणजे, देशातील आर्थिक विकासाच्या फळांचा असमान वाटा, जो वरील ५% लोकांपर्यंत जातो तो पायाभूत सुविधांमध्ये भागीदारी केलेल्या गरजुंना मिळू शकेल.
युनायटेड स्टेट्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी अमेरिकेतील नागरिकांना स्पर्धेऐवजी आशा, एकता आणि सहकार्याच्या नव्या करारासह या मोठ्या औदासिन्याला सामोरे जाण्यास सांगितले, तेव्हा कामगारांच्या श्रमाच्या मॉडेलकडे नाही तर या नैराश्यामुळे वेढलेल्या आर्थिक संकटाकडे लक्ष वेधले गेले. याचा केंद्रबिंदू हा ज्याला कुणाला काम हवे आहे त्याला किमान वेतनामध्ये काम मिळवण्याचा एक भव्य सार्वजनिक कामाचा कार्यक्रम होता. याने केवळ अमेरिकेतले मोठे हायवे बांधण्यासाठी मदत झाली नाही तर कुशल पण गरीब अशा कलाकारांना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कलेद्वारे काम करण्यासाठी पैसे देण्यात आले. हायवे आणि चित्रकृती या दोन्हीची अमेरिकेच्या पिढयांना किंमत राहील. भारताला त्वरित स्वतःचे नवे करार गरजेचे आहेत. मुक्त अंत, सर्जनशील आणि किमान वेतनात विस्तारित रोजगार हमी या नव्या कराराच्या केंद्रस्थानी असू शकतात.
१ मे हा लक्षात ठेवण्याचा दिवस आहे कारण या दिवशी अधिक न्याय्य आणि मानवी जगासाठी दीर्घ आणि यशस्वी संघर्ष झाला. आणि आठ तास कामकाजाचा दिवसासाठीचा विद्रोह झाला. भूक आणि अनादर हे अनेक विद्रोहाच्या वहिवाटा असतात. हे उठाव काही बदल घडवून आणणारे आहेतच पण ते सर्वांनाच मोलाचे समाधान देणारे आहेत असं नाही. भारतीय राज्यकर्त्यांनी हे समजून घेतल्यास शहाणपणाचे ठरेल. पण हेसुद्धा अगदी महत्वाचे आहे की आपण उर्वरित लोकांनी सहकार्य आणि एकतेने वागले पाहिजे.
निखील डे आणि अरुणा रॉय यांनी सदर लेख लिहिला आहे. हे दोघेही मजदूर किसान शक्ती संघटनेसोबत काम करतात. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. संपर्क – 9146041816
मुंबई । कोरोनाच्या लढाईत जिवाजी पर्वा न करता डॉक्टर, नर्स,पोलीस, सफाई कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाची लढाई ते संपूर्ण समर्पण देऊन लढत आहेत. अशा निडर कोरोना योद्धांचे मनोधर्य आणि आभार मानण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक गाणं गायलं आहे. ‘तू मंदिर, तू शिवाला’ असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या राज्य आणि संपूर्ण देश अभूतपूर्व अशा संकटातून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत लोकांमध्ये लढण्यासाठी प्रेरणा यावी यासाठी अमृता फडणवीस यांच्या गाणं गाण्यामागे उद्देश असल्याचे सांगितलं जात आहे.
अमृता फडणवीस यांची गाणी नेहमीच रसिकांचे लक्ष वेधून घेतात. याआधी सलमान खान, अजय देवगण या सेलिब्रिटींनीसुद्धा कोरोनावर गाणी प्रदर्शित केली आहेत. आशिष मोरे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून राजू सपकाळ यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या योद्धांसाठी हे गाणं समर्पित केलं आहे. चला तर पाहुयात अमृता फडणवीस यांच्या सुरेल आवाजातील हे गीत..
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”
थर्ड अँगल | कामगारांचे असुरक्षित हक्क पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करणे गरजेचे आहे. १ मे चा दिवस हा राष्ट्रीय संपत्तीचे निर्माणकर्ते कामगार आणि कष्टकरी यांच्या उत्सवाचा दिवस आहे. हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या लोकांचे सामर्थ्य दाखविण्याचा, कामगार आणि गरीब शेतकरी यांच्या एकत्रीकरणाचा, औद्योगिक संघ आणि कामगार चळवळीच्या ऐक्याचा आणि एकता दाखविण्याचा आहे. covid -१९ हा साथीचा रोग जगभरात त्रास देतो आहे. हा लोकांच्या आयुष्याचा बेरोजगारी, गरिबी, उपासमार आणि निराशेने विनाश करत आहे. जशी आर्थिक असमानता वाढत आहे तशी परिस्थिती खूप बिकट बनत चालली आहे. गरीब आणि कष्टकरी लोक संचारबंदी आणि जागतिक बंदीचा भार सोसत आहेत. या परिस्थितीने कामगार, त्यांचे राजकीय आणि औद्योगिक संघ संस्था यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. रोजंदारी कामगार आणि स्थलांतरित कामगार यांची स्थिती दयनीय आहे. उपासमारीने होणाऱ्या मृत्यूंची नोंद होते आहे. भारतातील संचारबंदीने आपल्या देशातील बेरोजगार तरुण, विद्यार्थी आणि बालकांच्या भविष्यावर परिणाम केला आहे. ऑनलाईन शिकवणे आणि शिकणे याचा प्रचार होऊनही, गरीब, बेघर आणि उपाशी मुलांकडे ते घेण्याची संसाधने आणि सुविधा उपलब्ध नाहीत. आंतरराष्ट्रीय कामगार संस्था (आयएलओ) यांनी एका चिंताजनक अहवालासह सांगितले आहे की, भारतातील ४० करोड कामगार गरिबीच्या खाईत ढकलले जाण्याचा धोका आहे. जे मुख्यतः असंघटित क्षेत्रातील असतील. आपल्या देशातील सद्यस्थितीत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोडीचे वैशिष्ट्य बदलले नाही. यामुळे सध्याच्या सरकारचा नवउदार मार्गही जैसे थें परिस्थितीतच आहे.
१ मे च्या दिवसाला दैदिप्यमान इतिहास आहे. मे १८८६ मध्ये पहिल्यांदा शिकागोचा हायमार्केट चौक हा कामगारांच्या ८ तास कामाच्या मागणीसाठीच्या वीर संघर्षाचा साक्षीदार झाला होता. ही मागणी भांडवलदारांना हे सांगण्यासाठी होती, की त्यांनी उत्पादन संसाधनांना खाजगी मालमत्ता म्हणून विनियमित केले होते. म्हणून त्याचा अर्थ असा नव्हता की ते कोणत्याही मोबदल्याशिवाय कामगारांकडून अंतहीन ओरड करण्यास भाग पाडतील. कष्टकरी लोक त्यांच्या मागण्यासाठी लढू शकतात हा संदेश पोहोचवण्यासाठी तो संघर्ष होता. या संघर्षात काही कामगार शहीद झाले. हायमार्केटचा संघर्ष जगभरातील कामगार वर्गाला प्रोत्साहन देतो. जगभरातील कामगारांचे दुसरे आंतरराष्ट्रीय संमेलन, ज्यामध्ये Friedrich Engels हे कार्ल मार्क्स यांचे सहचर आणि सोबती (कॉम्रेड) यांनी प्रमुख भूमिका निभावली, त्यांनी १८८९ मध्ये असे घोषित केले की मे चा दिवस हा कष्टकरी लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जाईल.
भारतामध्ये सुद्धा कष्टकरी वर्गाच्या संघर्षाचा शौर्यमय इतिहास आहे. हा अभिमानस्पद दिवस आहे. १ मे च्या दिवशी १९२३ मध्ये भारतात चेन्नईत हा दिवस पाळला गेला होता. ब्रिटिश आणि फ्रेंच भारतावर राज्य करीत असताना कामगार संघटना चळवळ उदयाला आली. कलकत्ता येथील ताग कामगार एका कामगार संघटनेअंतर्गत १८५४ मध्ये एकत्र आले होते. मद्रास प्रेस कामगार संघटना १९०३ मध्ये निर्माण झाली आणि कोरल मिल कामगार संघटना १९०८ मध्ये निर्माण झाली. ऑल इंडिया ट्रेड युनियनची स्थापना १९२० मध्ये झाली होती, म्हणून आपण अभिमानाने त्याचे शताब्दी वर्ष साजरे करीत आहोत. चेन्नईतील बी आणि सी कामगार संघटना यांनी एकत्र येऊन ३ एप्रिल १९१८ मध्ये नोंदणी केली होती. ही भारतातील पहिली नोंदणीकृत कामगार संघटना होती. पोंडेचेरीचे टेक्सटाईल मिल कामगार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली ८ तास कामाच्या मागणीसाठी लढत होते. ३० जुलै १९३६ रोजी कामगारांवर एक क्रूर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये १२ कामगार शहीद झाले. यामुळे शेवटी फ्रेंच वसाहतवाद्यांना आशियात पहिल्यांदा ८ तास कामाची मागणी स्वीकारण्यास भाग पाडले गेले.
जेव्हा भारतातील लोक वसाहतवादी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढत होते त्यावेळी कामगार संघटना या राष्ट्रीय चळवळीत अग्रभागी होत्या. त्यांचा संघर्ष हा राजकीय संघर्षासोबत गुंफलेला आहे. अगदी आजही कष्टकरी लोकांनी सध्याच्या सरकारविरुद्धच्या लढ्यात प्रमुख भूमिका निभवायची आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आक्रमकपणे कष्टकरी लोकांच्या कायद्यामध्ये छाटणी करीत कामगार कायदा बदलू पाहत आहे. तुम्ही कामाचे तास १२ तासांपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांकडे बघू शकता. राजकीय शक्तीसह भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या ऐहिक, भारताच्या लोकशाही, प्रजासत्ताक आणि धर्मनिरपेक्षाच्या विध्वंसाचा प्रचार करू पाहत आहे. आणि ते बदलून ईश्वरशासित हिंदुत्व राष्ट्र बनवू पाहत आहे. ही उदयोन्मुख परिस्थिती कष्टकरी लोकांना राजकीय आणि आदर्शवादी शिक्षणाची मागणी करीत आहे. राजकारण हे अर्थकारणच आहे. जागतिक भांडवलशाही खूप वाईट स्थितीत आहे. सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा यांच्यावर खर्च करण्याऐवजी स्पर्धात्मकरित्या सैन्य आणि युद्ध संसाधनांवर खर्च केला जात आहे. Stockholm आंतरराष्ट्रीय शांती संशोधन संस्थेने दिलेल्या अहवालानुसार यु.एस आणि चीननंतर भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे जो सैन्यावर खर्च करीत आहे. समाजवाद हा केवळ पर्याय आहे. पण हे तर फॅसिझम आणि नवफॅसिझमचे आमिष आहे. हा ट्रेंड कार्पोरट भांडवलशाही कडून प्रेरित आहे.
आजच्या दिवशी कष्टकरी लोकांना त्यांच्या वीर उत्क्रांतीच्या भूमिकेसाठी वंदन करीत असताना आपण समाजवादाशी लढण्यासाठी आपल्या प्रतिज्ञेचे नूतनीकरण करूया. समाजाला शोषण, अन्याय आणि सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त करूया. हा दिवस या संचारबंदीच्या काळात गरजू आणि असुरक्षित लोकांपर्यंत पोहोचून पाळूया. चला कष्टकरी लोकांना सध्याच्या सरकारविरुद्ध उभे करूया जसे ते देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी वसाहतवादी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे राहिले होते.