हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. या मुद्द्याला धरून प्रकाश आंबेडकर वारंवार इंडिया आघाडीवर टीका करताना दिसत आहे. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकरांना इंडिया आघाडीत का घेण्यात आले नाही यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी, प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत हिरवा कंदील देखील दाखवला आहे.
आज अकोल्या येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, आतापर्यंत प्रकाश आंबेडक यांना इंडिया आघाडीत का घेतलं नाही? यावर उत्तर देणारा शरद पवार म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. मात्र समान कार्यक्रमावर भाजपविरोधातील ज्या शक्ती एकत्र येऊ शकतील. यामध्ये यापूर्वी काय झालं याचा विचार न करता त्यांना सहभागी करावं. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. बाकीच्या लोकांना देखील विश्वासात घ्यावे लागेल.”
त्याचबरोबर, “आमची बैठक झाली नाही. इंडियाची बैठक होणार आहे. मुंबईला बैठक झाली त्यानंतर नागपूर किंवा इतर कुठं बैठक होणार, याबाबत आमची चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकर आरोप करतात पण ते आमच्यासाठी नवीन नाही. त्यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडी निर्णय घेईल.” असे शरद पवार यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यातूनच शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत आमंत्रित करण्याबाबत अप्रत्यक्षपणे हिरवा कंदील दाखवला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती झाली असताना देखील इंडिया आघाडी स्थापन करताना प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले नाही. तसेच इंडिया आघाडीची मुंबईत ज्यावेळी बैठक झाली त्या बैठकीचे देखील प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण गेले नाही. या मुद्द्याला धरूनच प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीवर टीका करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच, आम्हाला इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी काँग्रेस सकारात्मक नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे.