मास्क न घालताच मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद; मेट्रो प्रवासादरम्यान ची घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन पार पडले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पध्दतीने तिकीट काढून मेट्रोने प्रवासही केला. मात्र यावेळी मोदींनी मास्क न घातल्याचे निदर्शनास आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर गरवारे मेट्रो स्थानक ते आनंदनगर मेट्रो स्थानक पर्यंत प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रो मधील उपस्थिती विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत संवाद साधला. मात्र यावेळी चक्क मास्क च घातला नव्हता. एकीकडे पंतप्रधान मोदींनी मास्क घातला नसताना दुसरीकडे विद्यार्थ्यांनी मात्र कोरोना नियमांचे पालन करताना मास्क चा वापर केला होता.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी मास्क चा वापर हा राज्य सरकार कडून बंधनकारक करण्यात आला आहे. अशा वेळी पंतप्रधान मोदींनीच चक्क मास्क न घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, पुणे मेट्रो च्या उद्घाटना वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदि मान्यवर उपस्थित होते.