अकोला प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत ९ जागी वंचित आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निसटत्या पराभवाचे तोंड बघावे लागले आहे. त्यामुळे वंचित आघाडीने काँग्रेस आघाडी सोबत आगामी विधानसभा निवडणूक लढावी असे काँग्रेस नेत्यांना वाटते. परंतु अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आपली वेगळीच भूमिका मांडली आहे. विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद दिले तरच वंचित आघाडी काँग्रेससोबत जाईल अन्यथा ऑगस्ट अखेरपर्यंत आमचे उमेदवार जाहीर करू असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहे. वचिंत बहुजन आघाडी आपली भूमिका कॉंग्रेस समोर मांडणार आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत आहेत. राष्ट्रवादी कधीही भाजप सबोत जाऊ शकते. त्यामुळं राष्ट्रवादीसोबत युती शक्य नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान दुसरीकडं विरोधी पक्ष नसल्यामुळं शेतकऱ्यांचे हाल होणार आहे. त्यामुळं विरोधी पक्षाला जनतेने सत्तेत येऊ दयावे असे यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच एमआयएमसोबत आमची युती होणार असून आमच्यात कधीच कोणतेही मतभेद नसल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या भूमिकेकडे कॉंग्रेसचे नेते कसे बघतात हे आगामी काळात बघावे लागणार आहे. कॉंग्रेसने वंचितचा प्रस्तवा मान्य केला नाही तर वंचित स्वबळावर लढणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.