हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांची भेट खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी घडवून आणली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. मुख्य म्हणजे, अद्याप या भेटीदरम्यान शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे समोर आलेले नाही.
मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार यांनी महत्वाचे संकेत दिले होते. त्यामुळे लवकरच प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत आमंत्रित करण्यात येईल अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज या दोन्ही प्रमुख नेत्यांची भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान शरद पवारांनी इंडिया आघाडीत येण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित केल्याचे देखील म्हटले जात आहे. परंतु याविषयी कोणतीही ठोस प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांकडून देण्यात आलेली नाही.
दरम्यान, आज प्रकाश आंबेडकर हे वाय बी चव्हाण सेंटर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी स्टेजवर सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर स्वतः सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांना विनंती करत शरद पवारांशी भेट घडवून दिली. मात्र या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांनी कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली हे अद्याप उघडकीस आलेले नाही.