बीडमध्ये भाजपला धक्का ! प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे 14 जणांचे राजीनामे!

Pritam Mundhe
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

यानंतर भाजपमध्ये राजकीय वादाला सुरुवात झाली. खा.डॉ प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रिपदापासून डावलल्यानंतर जिल्ह्यात राजीनामासत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने , बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरल्याचे समोर आले आहे. दोन दिवसात तब्बल 14 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. आता आणखीन किती राजीनामे येणार ? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.