हा फारच चुकीचा निर्णय…, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पृथ्वीबाबा सरकारवर भडकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेवर गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न फेल ठरत आहेत. या सर्व घडामोडींमुळे राजकिय वातावरण तापले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेतला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

फारच चुकीचा निर्णय घेतला

राज्य सरकारकडून मराठा कुणबी समाजाला जात प्रमाणपत्र देण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, यासंदर्भात जीआर देखील काढण्यात आला आहे. परंतु या जीआरवर पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप नोंदवला आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करत पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेतला. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले आहे का? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवारांवर टीका

त्याचबरोबर, पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षणाच्या मुद्द्याला धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. यावेळी त्यांनी, “आज अजितदादांना पक्षांतरामुळे विसर पडलेला दिसतोय. मी मुख्यमंत्री असताना सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्यावेळी ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. आता दिल्लीमध्ये पण भाजप सरकार आणि महाराष्ट्रात देखील भाजप सरकार आहे. त्यामुळे भाजपने आता हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे” अशा शब्दात अजित पवारांना सुनावले आहे.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाकडून काढण्यात आलेल्या जीआर वर नाराजी व्यक्त केली आहे. “मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग केले आहेत. एक ज्यांच्याकडे निजामकालीन कागदपत्रं आहेत त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचं आणि दुसरं म्हणजे जे गरीब आहेत ज्यांच्याकडे कागदपत्रं नाहीत, राहण्यासाठी ज्यांच्याकडे घरही नाही ते पुरावे कसे सांभाळणार? त्यामुळे त्यांना हे आरक्षण मिळणार नाही” असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.