हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनावेळी करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यामुळेच मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज प्रकरणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी “आम्ही तिघांनीच पोलिसांना लाठीमाराचा आदेश दिला हे सिद्ध करून दाखवा ताबडतोब राजकारण सोडून देऊ” असे अजित पवार यांनी म्हणले आहे.
जालन्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. या लाठीमारात अनेक तरूण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज सरकारकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या लाठीमारासाठी माफी देखील मागितली.
पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, “मागच्या काळात मराठा समाजाने अतिशय शांततापूर्ण पद्धतीने आंदोलनं केली. ही आंदोलनं कौतुकास्पदच होती. पण जालन्यात जे झालं ते चूकच होतं. असं होता कामा नये, असं अजित पवार म्हणाले. सातत्याने आरोप केला जातोय की, वरून आदेश दिले. वरून आदेश दिले… पण हे आदेश कुणी दिले? असे आदेश दिलेत, असं तुमचं म्हणणं असेल तर ते सिद्ध करून दाखवा”
त्याचबरोबर, “काहीजण राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहेत. पण माझं मराठा समाजाला आवाहन आहे की, बांधवांनो कृपया शांतता राखा. मराठा आरक्षण संदर्भातल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. सरकार यासाठी योग्य ती पावलं उचलेल” असं आश्वासन अजित पवार यांनी केलं. दरम्यान, जालना घटनेमुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर आता मराठा आरक्षण मुद्दा चर्चेत आला आहे.