औरंगाबाद | तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे वाईट नजरेने एकटक बघणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील बगिच्यामध्ये सायकल खेळण्यास गेली होती. मागील २०-२५ दिवसांपासून पाठलाग करणारा दामोदर हा पीडितेकडे बाहेर उभा राहून वाईट नजरेने एकटक पाहात होता. शालेय साहित्य आणण्यासाठी फिर्यादी जात असतानाही पाठलाग करायचा. एके दिवशी मामाच्या घरी जात असतानाही आरोपी मागे आला व बाहेर उभा राहून एकटक पाहात होता. त्याबाबतची माहिती मामाला दिली. मामाने व इतरांनी मिळून आरोपीला पकडून जिन्सी पोलीस ठाण्यात नेले.
दरम्यान, पोलिसांनी तक्रारीवरून दामोदरविरुद्ध भादंवि कलम ३५४ व पोक्सो कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विशेष सरकारी वकील ज्ञानेश्वरी नागुला यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्याआधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. यामध्ये फिर्यादीची व घटनेतील प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”