हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीत खांद्याला खांदा लावून सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. दररोज सेनेचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात दाखल होऊ लागले आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेचे उघडपणे दोन गट पडल्याचे दिसून आले. अशात भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष नाव न घेता उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “शिवसेना म्हणजे भरकटलेले जहाज झाले आहे. शिवसेनेत फक्त बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहतील,” असे विखे पाटील यांनी म्हंटले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेचे 12 खासदारही बाहेर पडण्याची शक्यता आहे. शिवसेना भरकटलेलं जहाज होतं. यामध्ये बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्ते होते. आता शिवसेनेमध्ये तेवढेच शिल्लक राहतील असे मला वाटत आहे. शिवसेनेची काँग्रेसपेक्षा वेगळी अवस्था होईल, असं मला वाटत नाही.
मात्र, आता पक्षाच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास राहिला नाही. याचं दु:ख पक्षनेतृत्वालाही असेल. आज 55 पेक्षा 40 आमदार आज बाहेर पडले आहेत. आता उरलेल्या 15 आमदारांपैकी आणखी काही आमदार बाहेर पडण्याची शक्यता आहे,” असे भाकितही विखे पाटील यांनी यावेळी केले आहे.