मुंबई । भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते असताना विखेंनी बुडते जहाज वाचवण्याऐवजी शत्रूला जाऊन मिळणे पसंत केले. नुकतेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सत्तेसाठी लाचार अशी टीका केली होती. एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत असं विधान विखे यांनी केले होते. त्यावर थोरात यांनी आपण विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे! असे म्हणत पलटवार केला होता. आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही विखे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला असून ‘झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतूनच विखे टाळूवरचे केस उपटत असतील’ अशी टीका करण्यात आली आहे.
विखे-पाटील हे तर विरोधी पक्षनेते असतानाच भाजपमध्ये विलीन झाले. अशी हिंमत (लाचारी नव्हे!) अंगात भिनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थोरात वगैरे मंडळींचे कष्ट त्या दिशेने तोकडे पडले इतकेच म्हणावे लागेल. पक्ष संकटात असताना ज्यांनी उंदरांप्रमाणे उड्या मारल्या नाहीत व बुडते जहाज वाचवण्याचे प्रयत्न केले अशांना इतिहासाच्या पानावर स्थान मिळते. अशा एखाद्या पानावर विखे-पाटील कोठे आहेत काय? विखे-पाटलांनी काँग्रेसचा त्याग केल्याने काँग्रेसचे नुकसान झाले नाही व भाजपमध्ये गेल्याने भाजपचा दीडकीचा फायदा झाला नाही. विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांटउडीचे डोंबारी राजकारण प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे-पाटील यांनी भाजपवर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत हे त्यांनीच एकदा आठवून पाहावे. विखे-पाटील अधूनमधून बोलतात, ”आम्ही भाजपमध्ये खूश आहोत.” जे विखेंना ओळखतात ते यावर विश्वास ठेवणार नाहीत. झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतूनच ते टाळूवरचे केस उपटत असतील. असे सामनातील आजच्या अग्रलेखात म्हणण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय! असे म्हणत सामनतून विखे यांच्यावर टीका केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”
हे पण वाचा –
ट्विटरवर नूडल्सची ‘अशी’ रेसिपी व्हायरल झाली कि लोकं म्हणाले, ‘हा तर अपराध’
धक्कादायक! १३ वर्षीय बालिकेचा १८ वर्षाच्या तरुणासोबत ठरला होता विवाह; पण आदल्या दिवशी…
किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो
घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार