INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला? या नेत्याने केली मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया (India) आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची या महिन्याच्या अखेरीस मुंबई येथे बैठक होणार आहे. परंतु या बैठकीपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी “राहुल गांधी (Rahul Gandhi) काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील” अशी मोठी घोषणा केली आहे. अद्याप याबाबत इंडिया आघाडीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मुंबईतील बैठकीत इंडिया आघाडीकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील अशी माहिती समोर येत आहे. परंतु अशातच, अशोक गेहलोत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेहलोत यांनी म्हणले आहे की, काँग्रेसने २०१४ साली केलेल्या चुकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले आहे. तर जनतेच्या दबावामुळे सर्वच विरोधी पक्ष एकत्रित आले असल्याचे गेहलोत यांनी म्हणले आहे.

यासोबतच‌, ” या इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एक दिलाने एकत्रित आले आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वत्र इंडियाची जादू चालेल. प्रत्येक निवडणुकीत स्थानिक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. परंतु सध्या देशातील परिस्थितीमुळे सर्व पक्षांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. जनतेनेच असा दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची युती झाली आहे” अशी माहिती गेहलोत यांच्याकडून देण्यात आली आहे.

तसेच, एनडीएच्या ५० टक्के मतांच्या दाव्यावर बोलताना, “पंतप्रधान मोदी हे कधीही साध्य करू शकणार नाहीत. ते जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांना असं करता आलं असतं. पण आता त्यांना ५० टक्के मतं मिळू शकत नाहीत. याउलट त्यांच्या मतांची टक्केवारी आणखी कमी होईल. त्यामुळे २०२४ मध्ये पंतप्रधान कोण बनेल? हे आगामी लोकसभा निवडणुकांचे निकालच ठरवतील” असे देखील गेहलोत यांनी म्हणले आहे.