हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आधी वेदांता फॉक्सकॉन आणि आता नागपूर येथे होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशातील सर्व राज्ये मोठी झाली पाहिजेत. या गोष्टीकडे राजकीय म्हणून न पाहता देशाचा विकास करण्यासाठी प्रत्येक राज्य मोठं करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे असं राज ठाकरे म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते
खरं तर पंतप्रधान देशाचे आहेत आणि त्यामुळे देशातील प्रत्येक राज्य त्यांना मुलांसारखं असलं पाहिजे. महाराष्ट्रातील एखादा प्रकल्प समजा आसामला गेला असता तर मला वाईट नसत वाटलं पण वाईट या गोष्टीचे वाटत की जो कोणता प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय . मोदींनी पंतप्रधान या नात्याने याकडे स्वतः लक्ष द्यायला हवं. प्रत्येक गोष्ट जर गुजरातला जात असेल तर राज ठाकरे जेव्हा महाराष्ट्राबद्दल बोलतो तेव्हा याना संकोचित वाटण्याचे कारण काय ?? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे . तो संपूर्ण देशाचा विचार असला पाहिजे. देशातील सर्व राज्ये मोठी झाली पाहिजेत . प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. त्या त्या राज्यातील लोकांना नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जाण्याची आणि त्यांच्यावर ओझं बनण्याची आवश्यकता नाही. अशाप्रकारचे प्रकल्प देशातील प्रत्येक राज्यात गेली तर देशाचाच विकास होणार आहे असं म्हणत राज ठाकरेंनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
महाराष्ट्र हे राज्य उद्योग धंद्याच्या बाबतीत देशात सर्वात पुढे आहे. महाराष्ट्र हे उद्योग धंद्याच्या बाबतीत नेहमीच प्रगती पथावर राहिलेलं आहे. उद्योगपतींची पसंतीही महाराष्ट्रालाच राहिली आहे. त्यामुळे गुजरातला जास्त सुविधा आहेत आणि महाराष्टात नाहीत असं काहीही नाही असं राज ठाकरे म्हणाले. या गोष्टीकडे राजकीय म्हणून न पाहता देशाचा विकास करण्यासाठी प्रत्येक राज्य मोठं करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.