संजय राऊत मोठे नेते, पण यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधींकडेच राहील’ : बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांचे महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्वाचे योगदान आहे; पण यूपीएचं अध्यक्षपद हे सोनिया गांधीं यांच्याकडेच राहील असं विधान काँग्रेस नेते आणि राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेव थोरात यांनी केले आहे. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही असं म्हणत थोरात यांनी सोनिया गांधीच युपीएच्या अध्यक्षा राहतील हे स्पष्ट केले आहे. मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात यांनी आपले मत मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या कथित भेटीसंदर्भातही यावेळी थोरात यांनी भाष्य केले. ‘जी भेट झालीच नाही त्यावरुन वाद निर्माण केला जात आहे. अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करुन उपयोग नाही. भाजपने काहीतरी अफवा पसरवू नयेत’ असं मत थोरात यांनी व्यक्त केले.

दरम्यान, यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्याप्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व शरद पवार यांनी करावं असं संजय राऊत म्हणाले होते. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले होते.

You might also like