हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मुक्काम सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रोज सकाळी पत्रकार परिषद घेणारे , विरोधकांवर तुटून पडणारे संजय राऊत तुरुंगात नेमकं काय करत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांच्या आर्थर रोड तुरुंगातील दिनक्रमाची माहिती समोर आली आहे.
संजय राऊत यांचा कैदी क्रमांक ८९५९ आहे. संजय राऊत यांना स्वतंत्र बराकमध्ये ठेवण्यात आले आहे. राऊत या कारागृहात वेळ मिळाल्यावर ग्रंथालयात वाचन करतात, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोंडीवरील बातम्यांवर त्यांचे लक्ष असते. परवानगीनुसार त्यांना तुरुंगात वही आणि पेन देण्यात आले आहे त्यानुसार त्यांचे तुरुंगात देखील लेखणीला खंड न पडता लिखाण सुरुच असल्याची माहिती आहे. मात्र हे लिखाण त्यांच्यापुरतेच मर्यादित असून त्यांना ते बाहेर प्रसारित करता येणार नाही.
संजय राऊतांच्या खोलीमध्ये पंखा, स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना घरचे जेवण आणि औषध पुरवली जात आहेत. राऊत यांना हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे ते तेलकट खाणे टाळत आहेत तसेच घरचे वरण भात आणि चपाती भाजी असा त्यांचा डाएट प्लॅन आहे.