पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील व्हॅक्सिनवरून केंद्र सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे हि टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टबरोबर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. घरात नाही दाणा, पण मला “व्हॅक्सिन गुरू” म्हणा असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे. केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटत भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवले आहे. केंद्र सरकारच्या पापांचे फळ जनतेला भोगावे लागत आहे. या पापाचे प्रायश्चित्त भाजपला करावेच लागेल असा इशाराच रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
घरात नाही दाणा पण मला "वॅक्सिन गुरू" म्हणा…
भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल.#vaccine @PMOIndia pic.twitter.com/60FTKjJUCU— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 17, 2021
नवाब मलिकांचीही टीका
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील लसीकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाओसमध्ये आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आल्याचे यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले. केंद्रसरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी कंपल्सरी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाही तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
देश एकजूट, करा अटक
मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टर्स काही लोकांकडून लावण्यात आली आहेत. तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे बोलत आहेत. सारे भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस विदेशात पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच ना? पण केंद्रसरकार मात्र प्रश्न विचारणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय… किती लोकांना अटक करणार मोदीजी? असा संतप्त सवालदेखील रुपाली चाकणकर यांनी विचारला आहे.