रायगडावरील ‘त्या’ प्रकारावरून संभाजीराजे आक्रमक; पुरातत्व विभागास पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेणारे खासदार छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक झाले आहे. दुर्गराज रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी आज नवी दिल्लीमधील भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचलाकांना पत्र लिहिले आहे. रायगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भात लक्ष घाऊन या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी पत्रामधून त्यांनी केली आहे.

पुरातत्व विभागास लिहलेल्या पत्रात संभाजीराजे यांनी म्हंटले आहे की, “किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी केली. तसेच त्यावर चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शिवभक्तांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधून यासंदर्भात निदर्शनास आणून दिले.

वास्तविक पाहता ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे. किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा,” अशी मागणी या पत्रामधून संभाजीराजे यांनी केली आहे.