हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनतर अडीच वर्षातच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतरही भाजप- आणि शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रच आहे, परंतु शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालय.
आज वरळी येथे ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी आपल्या भाषणात संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी करत भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. परंतु काही मुद्द्यांवरून त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सुद्धा कान टोचले. आपण जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत आपली महाविकास आघाडी कायम असेल, पण ती कितीकाळ टिकवायची हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे असं संजय राऊत काँग्रेस- राष्ट्रवादीला उद्देशून म्हणाले. आणि सतत काय भावी मुख्यमंत्र्यांची बॅनरबाजी करता? समोर उद्धव ठाकरे यांच्या रूपाने विद्यमान मुख्यमंत्री बसले आहेत. असेही त्यांनी म्हंटल.
यावेळी संजय राऊत यांनी थेट स्वबळाचा नारा दिला. मुंबईत आमचीच सत्ता येणारच आहे. तसेच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातही स्वबळावर शिवसेनेची सत्ता आणू आणि भगवा फडकवू असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊतांच्या या विधानाने ठाकरे गटाच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, कोर्टाच्या निकालावरून संजय राऊतांनी शिंदे गटावर सुद्धा तुफान घणाघात केला. शिवसेना एकच आहे. डुप्लिकेट माल खूप असतात असा टोला संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला. कोर्टाचा निकाल म्हणजे शिंदे गटाला एकप्रकारची फाशी आहे. कोर्टाने फाशीचा निर्णय दिला आहे आणि ती कधी द्यायची, किती दिवसात द्यायची याचे अधिकार मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याना दिलाय अस म्हणत त्यांनी जोरदार प्रहार केला.