हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सच्या धाडी पडल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आता मुंबई महापालिकेतील शिपायाच्या घरीही केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडतील असा टोला त्यांनी लगावला आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, मुंबई महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरु होईल. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणा महापालिकेतील शिपायांच्या घरीही धाडी टाकू शकतात. महापालिकेतील अनेक शिपाई शर्टाच्या खिशावर धनुष्यबाणाचं चिन्ह लावतात. मराठी माणूस आणि शिवसैनिक असल्यामुळे ते धनुष्यबाणाचं चिन्हं लावतात. त्यामुळे उद्या त्यांच्या घरावरही धाडी पडू शकतात असा टोला त्यांनी लगावला.
आता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. 2024पर्यंत आम्हाला हे सहन करायचं आहे. आमच्यावर खोटे गुन्हा देखल करा, केंद्रीय सुरक्षा दल आमच्या दारात उभं करा, आम्हाला कितीहि त्रास दिला तरी आमच्या तोंडून सत्यच बाहेर पडेल असे म्हणत भाजपची लोक काय धुतल्या तांदळासारखे आहेत काय ? असा सवाल संजय राऊत यांनी केला.