संजय राऊतांना आवरा; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपवर घणाघाती टीका करत आहेत. त्यातच त्यांनी आज भाजप नेते किरीट सोमेय्या यांच्यावर टीका करताना चुतीया असा उल्लेख केला. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला तसेच संजय राऊत यांना आवरा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आपण जे काही केलं त्यामुळे आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर कारवाई होईल अशी त्यांची स्थिती झाल्यामुळे संजय राऊत हे सैरभैर झाले आहेत. ते सातत्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या लाजवणारे शिवराळ शब्द वापरतात. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना विनंती करतोय की संजय राऊत यांना आवरा अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, संजय राऊतांनी शिवसेनेला संपवण्याचं कंत्राट घेतलं आहे. राऊत शिवसेनेची प्रतिमा मलिन करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचे कुठलेही प्रवक्ते बोलत नाहीत. अनिल देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे कोणीच बोलत नाही. फक्त संजय राऊत बोलतात आणि पंतप्रधान मोदींना शिव्या घालतात. राज्यपालांना शिव्या घालतात. यामुळे शिवसेनेची प्रतिमा मलिन होतेय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.