मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खातेवाटपाआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान केला पण सत्तार का नाराज आहे हे अजून समजलेले नाही असे राऊत म्हणालेत.
‘सत्तारांनी राजीनामा का दिला अद्याप समजले नाही. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला की नाही, हे फक्त मुख्यमंत्री किंवा राजभवनाची सुत्रे सांगतील. पण ते नाराज का आहेत माहित नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्री करून सन्मान केला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यात जास्त मंत्रिपदे आलेली नाहीत. त्यामुळे सर्वांना अॅडजेस्ट करावे लागते.’ तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी विलंब होत असल्याचं चुकीचं असल्याचेही ते म्हणाले.
बाहेरून शिवसेनेत आलेल्यांना अॅडजेस्ट व्हायला वेळ लागेल. जे नाराज आहेत ते शिवसैनिक नाहीत, असा खोचक टोला राऊत यांनी नाराजांना लगावला आहे.
महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News