चांद्रयान २ तांत्रिक अडचणींमुळं अडलं, आदित्य ठाकरे मात्र मुख्यमंत्रीपदावर पोहचतीलच – संजय राऊत

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी मुंबई। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले. असं पहिल्यांदा घडणार आहे की, ठाकरे घराण्यातील कुणी व्यक्ती थेट निवडणूक रिंगणात उतरणार आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचे घोषित केले असताना, दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य मुख्यमंत्री बनणार असल्याचा दावा केला आहे. सोमवारी वरळीत पार पडलेल्या विजय संकल्प मेळाव्यात त्यांनी हा दावा केला आहे.

खासदार राऊत यांनी आदित्य यांच्या निवडणूक लढण्याची तुलना चांद्रयान २ शी केली आहे. वरळीतील मेळाव्यात उपस्थित कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकारी यांना उद्देशून ते म्हणाले की,” काही तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-२ चंद्रावर पोहचू शकले नाही, मात्र आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, येणाऱ्या २१ ऑक्टोबरला आदित्य ठाकरे मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर जरूर पोहचतील.”

आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यास उपमुख्यमंत्री पद मिळेल अशा चर्चा माध्यम विश्वात सुरु होत्या. परंतु खासदार राऊत यांच्या दाव्यानंतर भाजप काय प्रतिक्रिया देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विधानसभा निवडणूक निकालच या सर्व दावे-प्रति दाव्यांना उत्तर देतील यात शंका नाही.