थर्ड अँगल | योगेश नंदा सोमनाथ
जिथे विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरु होतं असा बऱ्याच धार्मिक मंडळींचा विश्वास आहे. चित्रपटातही आम्हाला शक्य होतं तेवढे प्रयत्न आम्ही केले आता सगळं भगवंताच्या हातात आहे असे डॉक्टर छाप डायलॉग्जही आपण बऱ्याचदा ऐकले आहेत. देव आणि धर्माशी पंगा घेतला की मग सामान्यांतील असामान्य माणसालाही सोडलं जात नाही. मात्र जगावर आता असा बाका प्रसंग आला आहे की देवाला रिटायर करा हा श्रीराम लागू यांचा संदेश किमान १५ दिवसांसाठी का होईना जगभरात सगळ्याच देवस्थानांना लागू करण्यात आला आहे.
लोकांनी एकमेकांच्या संपर्कात यायचंच नाही. फक्त घरी बसून रहायचं. हे असं बसून राहणंच सगळ्यांसाठी जास्त हितकारक आहे हे आता सगळ्याच जगाला कळून चुकल्यामुळे गावातील बिरोबा, खंडोबा, विठोबा, जोतिबा, दत्त दिगंबर, मारुती, जानाई-मळाई, जुगाई या मंदिरांपासून ते प्रसिद्ध अंबाबाई, तुळजाभवानी, वैष्णोदेवी, एकविराआई, शिर्डी, शनि-शिंगणापूर, बालाजी, गणपती मंदिरांपर्यंत सगळंच शटडाऊन अवस्थेत आलं आहे. आज याचा विशेष उल्लेख करण्याचं कारण आहे शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा रोखठोक या सदरातील लेख.
‘देवांनी मैदान सोडलं’ या आपल्या लेखात राऊत यांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या छोटेखानी पुस्तकाचाच पुढचा कित्ता गिरवलाय असं म्हणायला वावगं वाटणार नाही. कोरोना आजारामुळे सर्व जग त्रस्त असताना आता देवाचा धावा कुणीच करणार नाही, कारण देवांनी मैदान कधीच सोडलं आहे. मनुष्यजातीवर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती कोसळली आहे तेव्हा तेव्हा देवांनी पहिल्यांदाच माघार घेतल्याचं आपल्या लेखात स्पष्ट करत गाव शिवारातील साधं मंदिर ते व्हॅटिकन सिटीपर्यंत सर्वच धार्मिक स्थळं निष्प्रभ ठरल्याचं संजय राऊत यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केलं आहे.
शिवसेना हा ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष मानला जातो. आणि सामना हे त्यांचं अधिकृत मुखपत्र. तोडा-फोडा-खळबळ माजवा याच्या पलीकडे जाऊन सामना आता वास्तवाचं भान दाखवणारी भूमिका घेऊ लागली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाही काँग्रेसचं वावडं सुरुवातीच्या काळात नव्हतंच. किंबहुना राज्याच्या राजकारणात शिवसेनेने तग धरला तोच मुळी सुरुवातीला काँग्रेसला पाठिंबा देऊन. आता मंदिर-मस्जिद भूमिकेत न अडकता शाळा, दवाखाने, संशोधन संस्था उभारण्यात स्वारस्य दाखवणाऱ्या शिवसेनेला लोकही नावजू लागले आहेत. कोरोनाशी लढताना उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला संयम आणि उचललेली पावले ही जबाबदार राज्यप्रमुखाची लक्षणे दाखवतात. भाजपच्या पांघरुणाखाली राहून त्यांना हे शक्य झालं असतं की नाही ते आता मैदान सोडलेल्या देवालाच विचारावं लागेल. तूर्तास ‘सामना’ला आणि पर्यायाने शिवसेनेला कोरोनाने प्रबोधनकारांच्या वाटेवर नेलं असं म्हणायला नक्कीच चान्स आहे..
संजय राऊत यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी – https://www.saamana.com/rokhthok-sanjay-raut-corona-effect-on-temples-and-pilgrimages/
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४ वरुन ७४ वर
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश
बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर
धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास
लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!
सोळा दिवसांच्या उपचारानंतर १३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात