सरकार निर्लज्ज आणि लाचार; संजय राऊतांचा घणाघात
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान केलं जातंय, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील सरकार निर्लज्ज आणि लाचार आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, सरकार निर्लज्ज आहे. महापुरुषांबद्दल यांना काही संवेदना नसतील याचा अर्थ हे सरकार लाचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी हे गप्प आहेत, फुले- आंबेडकरांचा अपमान झाला तरीही हे गप्प आहेत आणि उगीच आमच्या विरोधात गांडुळासारखी वळवळ करत आहेत अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, उद्याचा महाविकास आघाडीचा मोर्चा हा महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात आहे. जर हे सरकार महाराष्ट्रप्रेमींना मोर्चाची परवानगी नाकारत असेल तर या राज्यात महाराष्ट्रद्रोही सरकार सत्तेवर बसलंय असं म्हणू शकता. उद्याचा मोर्चा हा ठरला आहे आणि तो होणारच आहे. जर परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी केली तर त्याचे फार वेगळे परिणाम या महाराष्ट्रात उमटतील, असा इशारा सुद्धा संजय राऊतांनी दिला.