ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून ईडी तसेच केंदीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली असून त्यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. याबाबत राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ‘असत्यमेव जयते’ असे ट्विट द्वारे म्हंटले आहे.

संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना याबाबात माहिती समजल्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करीत दोनच शब्दात पहिली प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये त्यांनी ‘असत्यमेव जयते’ असे लिहले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ईडीने माझ्या संपत्तीवर कारवाई केली. या कारवाईत ईडीने माझे राहते घरही जप्त केले. अलिबाग आणि मुंबईतील राहते घर व जमीन ईडीने जप्त केले आहे.

2009 साली आमच्या कष्टातून घेतलेली जमीन आणि घर यासंदर्भातील कोणतीही चौकशी न करता जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग म्हणतात 1 रुपया खात्यात आला असेल आणि तसं झालं असेल तर आम्ही सगळी संपत्ती भाजपला दान करायला तयार आहोत. दादर सारख्या भागात माझ्यासारख्या मराठी माणसाचे माझे राहते घर आणि अलिबाग येथील माझी जमीन ताब्यात घेतली आहे. माझ्यावरील कारवाई हि राजकीय सूडाच्या भावनेतून करण्यात आलेली आहे. जे घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहेत. महाराष्ट्रालाही कळेल कि काय चालले आहे, असे राऊत यांनी यावेळी म्हंटले.