हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले. अजित पवार यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली असतानाच आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच याबाबत बोलताना संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असं म्हंटल आहे. बारामती येथील सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची पाहणी करताना त्यांनी संवाद साधला यावेळी शरद पवारांनी संभाजी महाराजांच्या मुद्द्यावर भाष्य केलं.
शरद पवार म्हणाले, संभाजी महाराज यांच्या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या दोन्ही बिरुदाबाबत तक्रार नाही. दोन्ही उपाधी या योग्य आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. धर्मवीर असो वा स्वराज्यरक्षक, ज्या व्यक्तींना संभाजी महाराजांबद्दल आस्था आहे, त्या आस्थेच्या पाठीमागे काही विचार आहे. त्या विचारातच ही आस्था आहे. त्यामुळे धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा. किंवा त्यांनी स्वराज्याचे रक्षण केलं म्हणून स्वराज्यरक्षक म्हणा. परंतु धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षक यावरून कोणताही वाद नको असं शरद पवार यांनी म्हंटल.
दरम्यान, औरंगजेब हा हिंदूद्वेष्टा नव्हता असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होत त्याबाबत विचारलं असता मात्र शरद पवारांनी बोलणं टाळलं. आव्हाड काय म्हणाले हे मी पाहिले नाही त्यामुळे त्यावर बोलणार नाही. अजित पवार काय बोलले हे मी टीव्ही वर बघितलं होत म्हणून मी त्या विषयावर बोललो मात्र आव्हाड काय म्हणाले हे मी बघितलं नाही असं म्हणत पवारांनी चेंडू टोलवला.