हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात हिंसाचाराच्या घडत असलेल्या घटनावरून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. कोल्हापुरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर अशांततेची परिस्थिती आहे. अशा घटनांना सत्ताधारी पक्ष प्रोत्साहित करतोय.” असा आरोप पवारांनी केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खा. पवार म्हणाले की, देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळमध्ये भाजप नाही. तामिळनाडूत नाही. कर्नाटकात नाही. तेलंगणात नाही. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. हे मान्य करू. मध्यप्रदेशात आमदार फोडले राज्य आणले. यूपीत भाजपची सत्ता आहे. झारखंड, छत्तीसगड, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी भाजप नाही. भाजप फक्त गुजरात, यूपी आणि आसाममध्ये आहे. म्हणजे राज्याच्या निवडणुकीत लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल.
वास्तविक पाहता आगामी निवडणुकीत विरोधी पक्षातील पक्ष जागा लढवू शकतात. पण कशासाठी जागा लढवायच्या? एकमेकांच्या पायात पाय घालून विरोधकांची शक्ती विभाजीत करून सत्ताधाऱ्यांना मदत करणं हे काही शहाणपणाचं नाही. मर्यादित जागा लढवून आपली शक्तीस्थानं आहेत तिथे लक्ष केंद्रीत करता येईल का हे पाहणे राजकीय व्यवहाराचे लक्षण असल्याचे पवार यांनी म्हंटले.