हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जोरदारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या बीड, येवला, कोल्हापूर याठिकाणी भव्य सभा पार पडल्या आहेत. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची येत्या 24 ऑक्टोंबर रोजी पुण्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेत शरद पवारांची कोणावर तोफ धडाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर शरद पवार यांच्या कामाला जोर आला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आले असल्यामुळे शरद पवार यांच्या बैठका, सभा जोमाने आयोजित केल्या जात आहेत. यापूर्वी शरद पवारांच्या मागील तीन सभा बीड येवला कोल्हापूर याठिकाणी झाल्या आहेत. आता त्यांची चौथी सभा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेत शरद पवार नक्की कोणते मुद्दे उपस्थित करून सरकारवर हल्लाबोल करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघर्ष यात्रेची सुरुवात शरद पवार यांच्या या सभेपासून करण्यात येणार आहे. तर यात्रेची सांगता नागपूरमधील शरद पवार यांच्या सभेत होईल. युवा संघर्ष यात्रेमध्ये आमदार रोहित पवार राज्यातील तरुणांचे विविध प्रश्न जाणून घेतील. आणि या सर्व प्रश्नांना हिवाळी अधिवेशनात मांडतील. या पदयात्रेमध्ये कोणत्याही चिन्हाचा गाड्यांचा वापर करता येणार नाही. या पदयात्रेमध्ये कोणालाही सहज सहभागी होता येईल. या पदयात्रेमध्ये फक्त राज्यातील तरुणांचे प्रश्न, अडचणी केंद्रस्थानी राहतील.
दरम्यान, ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील अनेक मंत्र्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंकजा मुंडे आणि शरद पवार अशा प्रमुख नेत्यांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी पार पडणार आहेत. यामुळे संपूर्ण राज्याच लक्ष या सर्व सभांवर राहणार आहे. मुख्य म्हणजे, पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्यावर दिल्यानंतर शरद पवार यांची पुण्यातच भव्य सभा पार पडणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.