हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधीचा अनेकवेळा उल्लेखही भाजपकडून केला जातो. दरम्यान, पहाटेच्या शपथ विधीमागील घडलेल्या घडामोडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती दिली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकनंतर शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठीअडून बसल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला होता. त्यावेळी माझी आणि मोदींची दिल्लीमध्ये भेट झाली. तेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. तेव्हा पंतप्रधान मोदींनीच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबर आघाडी करून सरकार स्थापन करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र मी त्याला नकार दिला, असा गौप्यस्फोट पवारांनी केला.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यातील पहाटेच्या शपथविधीमागील कारण सांगितले. यावेळी पवार म्हणाले की, ज्यावेळी 2019 ची विधानसभा निवडणुक पार पडली. त्यावेळी लागलेल्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपामधील मतभेद वाढू लागले होते. कारण शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली होती. तेव्हा माझी आणि मोदींची दिल्लीमध्ये भेट झाली. तेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तशीच इच्छा होती. मात्र मी पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन हे शक्य नाही, याची कल्पना मोदींना दिली. तेव्हा अजूनही विचार करा, असा सल्ला मोदींनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या त्या शपथविधीसाठी मी अजित पवारांना भाजपासोबत पाठवल्याची चर्चा नेहमीच होते. मात्र, मी त्यांना पाठवले असते तर त्यांनी सरकारच स्थापन केले असते. त्यांनी अर्धवट काम केले नसते, असे पवार यांनी यावेळी सांगितले.