शिवसेना नगरसेवकाची तरुणाला बेल्ट, लोखंडी रॉडने बेदम मारहाण

Maarhan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अंबरनाथ : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाची दादागिरी पाहायला मिळाली आहे. या प्रकरणात नगरसेवकाने आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. त्यांनी त्या संपूर्ण शरीर काळे निळे होईपर्यंत मारहाण केली आहे. हि मारहाण जुन्या भांडणाचा राग मनात धरून करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रवी जयसिंघानी असे आहे. तो जुना अंबरनाथ गाव परिसरातील धर्माजी पाटील कॉलनीमध्ये राहतो. रात्री सव्वा बाराच्या सुमारास रवी आपल्या घराबाहेर एकटा फिरत असताना शिवसेना नगरसेवक आकाश पाटील आपल्या दोन साथीदार यश आणि मनीष यांच्या सह तिथे आला. यानंतर नगरसेवक आकाशने रवीला ‘तू बाहेर का फिरतो आहेस’ असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर आकाशने आपल्या कमरेला असलेला बेल्ट काढून रवीला बेदम मारहाण केली. तसेच आकाशच्या बरोबर असलेल्या यश पाटील आणि मनीष यांनी देखील रवीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या दोघांनी लोखंडी रॉडने रवी चा पाठीवर छातीवर पोटावर पायावर मारहाण केली.

या मारहाणीमध्ये रवीच्या संपूर्ण शरीरावर काळे निळे डाग पडले असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सोडण्यात आले आहे. रवीला मारहाण झाल्यानंतर त्याच्या शरीरावर जे काय निळे डाग पडले होते, त्यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. तसेच या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणी कोणी मारहाण केली आणि आपल्याला न्याय मिळावा अशी याचना रवी करत आहे. या प्रकरणी रवीने अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांनी शिवसेना नगरसेवक आकाश पाटील, यश पाटील आणि मनीष विरोधात भारतीय दंड संहितेच्या ३२४,५०४,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.