हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती व राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या विषयावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. “भाजपवाले दुधात मिठाचा खडा टाकण्याची एकही संधी सोडत नाहीत. आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे फडणवीस बोलू लागले आहेत. फडणवीसांची वक्तव्ये आता कोणी गांभीर्याने घेत नाहीत. शब्द द्यायचा व नंतर वेळ येताच मोडायचा हे भाजपलाच चांगले जमते. परंतु भाजपचा शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव फसला असल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सामनातून म्हंटले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रकरणावरून भाजपच्या फसलेल्या डावाबाबत शिवसेनेने सामनातील अग्रलेखातून भाजपवर निशाना साधला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपा व त्यांच्या लोकांनी सुरू केले आहे. दुधात मिठाचा खडा टाकण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. संभाजीराजे प्रकरणात ते पुन्हा दिसले. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजेंच्या विषयाला फोडणी देणे हे घाणेरडे राजकारण आहे. महाराष्ट्राच्या मातीतले निर्मळ मन, सचोटी व मोकळेपणाचा शेवट हे लोक करू पाहत आहेत, अशीही टीका शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेने छत्रपती घराण्याचा सदैव मान राखला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला असे वाटत नाही. हे सर्व भाजपावाल्यांचेच घाणेरडे राजकारण चालले आहे. असे परखड मत छत्रपती शाहूंनीच मांडल्यावर फडणवीस यांचीच कोंडी झालेली दिसते. फडणवीस यांनी संभाजी छत्रपती प्रकरणात उडी घेतली, पण उडी फसली हे स्पष्ट झाले असल्याचे अग्रलेखात म्हंटले आहे.
भाजपचे कोंडीत पकडण्याचे राजकारण फसले
“राज ठाकरे यांच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली. पुढे त्यांच्या अयोध्या दौऱ्यास उत्तेजन देऊन पुन्हा आपल्याच खासदाराकडून जोरदार विरोध करायला लावला व एकप्रकारे मोठी कोंडीच निर्माण केली. हाच त्यांचा राजकीय पॅटर्न असतो. शिवसेना असे कधीच करत नाही. जे करायचे ते समोर, बोलायचे तोंडावर पाठीमागून नाही, असेहि शिवसेनेने म्हंटले आहे.
भाजपनेच संभाजीराजेंना सापळ्यात अडकवले
संभाजीराजे यांची कोंडी करायला सुरुवात केली ती भाजपानेच. संभाजीराजे फडणवीस यांना भेटले व पाठिंब्यासाठी विनंती केली. तेव्हा ‘‘आम्ही संभाजीराजांना पाठिंबा देतोच’’ असे फडणवीस म्हणाले नाहीत. त्यांनी राजेंना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. ‘‘विचार करू’’, ‘‘वरच्यांना विचारून निर्णय घेऊ’’ अशी उत्तरे त्यांनी दिली. त्यामुळे सहाव्या जागेसाठी अपक्ष लढू पाहणाऱ्या संभाजीराजेंना भाजपानेच सापळ्यात अडकवले, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.