हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांना केलेली दंडाची रक्कम माफ करण्यास मान्यता देण्यात आली. यानंतर विरोधकांकडून वारंवार टीका होऊ लागल्याने सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत थेट आव्हान दिले. अधिकाऱ्यांनी सुडबुद्धीने ‘छाबय्या विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम अनधिकृत ठरवले. जर एक इंचही बांधकाम अनधिकृत ठरलं तर आमदारकीचा राजीनामा देईन, असे सरनाईक यांनी म्हंटले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी सुडबुद्धीने ‘छाबय्या विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम अनधिकृत ठरवले. तांत्रिक बाजू ग्राह्य धरुन जाता जाता त्यांनी या इमारतीची जी मंजूर फाईल होती त्यावर ताशेरे ओढले. आता एक इंचही बांधकाम अनधिकृत ठरलं तर आमदारकीचा राजीनामा देईन.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते. त्यावेळी त्यांनी विहंग गार्डनमध्ये कोणतंही अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. महापालिका स्तरावर निर्णय घ्या, असे फडणवीसांनी सांगितलं होते. त्यामुळे किरीट सोमय्या आणि भाजपा नेत्यांनी अभ्यास करुन बोलावे, असा टोलाही सरनाईक यांनी लगावला.