हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने नुकताच कोरोना लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार केला असल्याची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली. त्याचा जल्लोषही साजरा करण्यात आला. कोरोना विरोधातील लढाईत भारताचे हे मोठे यश असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे. देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा आहे. वास्तविक देशात आतापर्यंत केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्या आहेत. हे आम्ही पुराव्यासह सिद्ध करु, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमसनही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशात चाललंय काय? एकीकडे चीनी सैन्य भारतात घुसखोरी करत आहे. जम्मू-काश्मिरमध्ये हिंदूंचे हत्याकांड सुरु आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून देशात लसीचे उत्सव साजरे केले जात आहेत, अशी टीका राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.
राऊत यांनी यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक होते. त्यांनी देशाला क्रांतीची दिशा दाखवली. त्यांनी ब्रिटीशांच्या मनात दहशत निर्माण केली. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना एकच आवाहन आहे की, सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात यावे.