हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर काल ईडीने कारवाई केली. या कारवाईवरून युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “संजय राऊत यांच्या झालेली ईडीची कारवाई सुड बुद्धीतून झाली. संजय राऊत यांचा गुन्हा काय? हे भाजपचे नेते सुद्धा सांगू शकणार नाही. दीड महिने विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत बोलले. त्यांच्या प्रयत्नांनी भाजपचे 105 आमदार घरी बसवले आणि सेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवला. म्हणून त्यांच्यावर कारवाई केली असावी, असे सरदेसाई यांनी म्हंटले.
युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीकडून कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांनी एक हाक आम्हाला द्यावी. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक, युवासैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
शिवसेना कुणाची टीम असल्याच्या आरोप केला जात आहे. मात्र, शिवसेना कुणाची टीम आहे, असे मला वाटत नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री आहेत. शिवसेना किंग मेकर नाही तर किंगच्या भूमिकेत आहे. संजय राऊत शिवसेनेची बुलंद तोफ आहे. महाविकास आघाडीला एकत्र आणण्यासाठी राऊत साहेब यांची महत्त्वाची भूमिका आहे, असेही यावेळी सरदेसाई यांनी म्हंटले.