मुखात रामाचे नाव अन वर्तन बिभीषणाप्रमाणे…; शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा

devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर घणाघाती टीका केली. फडणवीसांच्या सभेवरून शिवसेनेनेही भाजपा आणि फडणवीसांवर टीका केली आहे. “फडणवीस नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. त्यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे. फडणवीसांची रामभक्ती तकलादू आह, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून आज फडणवीसांवर निशाणा साधण्यात आलेला आहे. “ महाराष्ट्रात भाजपचा अपघात अटळ आहे. महाराष्ट्रात एकदा अपघात झाला की, दिल्लीच्या तंबूचा पायाही हलू लागेल. शिवसेनेच्या मुंबईतील सभेला फडणवीस व त्यांचे लोक चांगल्या पद्धतीने उत्तर देतील असे वाटले होते, पण फडणवीसांनी शिवसेनेला उत्तर देण्यासाठी निवडली ती उत्तर भारतीय सभा. उत्तर भारतीय सभेत राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राची व मुख्यमंत्र्यांची बदनामी केली.

फडणवीसांच्या सभेत हनुमान चालीसेचे पठण करण्यात आले. मात्र, पायात चपला घालून ‘हनुमान चालिसा’ वाचण्याची आपली परंपरा नाही हे भाजपावाल्यांना कोणीतरी सांगायला हवे. श्रीरामाचे वास्तव्य महाराष्ट्रात होते. नाशिकचे पंचवटी आणि नागपूरजवळील रामटेक हे प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झाले, पण नागपूरच्या फडणवीसांनी श्रीरामाचा सत्यवचनाचा गुण घेतलेला दिसत नाही. ते सध्या फक्त खोटे आणि खोटेच बोलत आहेत. राज्य सोडावे लागले तेव्हा श्रीरामाने तो निर्णय स्वीकारला. त्यांना वैफल्य आले असे रामायणात कोठेच दिसत नाही, अशी टीका फडणवीसांवर केलेली आहे.