वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेचा औरंगाबादेत ‘आक्रोश’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाला औरंगाबादमध्ये सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. औरंगाबादचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांति चौकातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले असून हा मोर्चा क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत निघाला. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून याकरिता केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

संजय राऊत यांच्या नेतृत्वात औरंगाबदमध्ये शिवसेनेचा मोर्चा काढला. यावेळी संजय राऊत यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, महागाईच्या विरोधात आम्ही चलो दिल्ली अशी हाक दिली आहे. या आंदोलनाचा प्रसार संपूर्ण देशात होणार आहे. मराठवाड्यात फक्त या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. आता हे लोण संपूर्ण देशभर पसरेल. देशातील जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करण्याच्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. याची सुरुवात औरंगाबादमध्ये होत आहे. असेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भूमरे यांचीही उपस्थिती दिसून आली. यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. गेल्या आठ दिवसांपासून औरंगाबाद शहरात या मोर्चाचे आयोजन केले जात आहे. दिवाळीच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेने शहरात या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र या आंदोलनावर टीका केली आहे. शिवसेनेची ही भंपकगिरी असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

Leave a Comment