छत्रपतींच्या वंशजांना उमेदवारी न देणाऱ्यांनी आमच्या घराण्याबाबत बोलू नये; शिवेंद्रराजेंचे राऊतांना प्रत्युत्तर

Shivendraraje Bhosale Sambhajiraje Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
“छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? संजय राऊतांनी खा. संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्याला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे प्रत्युत्तर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊत यांना दिले.

काल साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि छत्रपती घराण्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला आज आ. शिवेंद्रराजे यांनी माध्यमांशी संवाद साधत उत्तर दिले. यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले की, “संजय राऊतांनी चेले म्हणणे हे हसण्यासारखे आहे. त्यांनी केलेले वक्तव्य हे महत्व देण्यासारखे नाही. शेवटी लोकशाहीत अनेक पक्ष असतात. त्या पक्षांच्यासोबत राहून आपल्या मतदार संघातील प्रश्न सोडवणे गरजेचे असतात. वेगळं काही तरी बोलणे हे लोकशाहीत चालत नाही.”

भाजपमध्ये छत्रपतींना मान नाही, असे संजय राऊत म्हणत आहेत. माझा सवाल आहे राऊत व ठाकरेंना कि छत्रपती घराण्याबद्दल आदर व प्रेम आहे असे ते म्हणत असतील तर त्यांनी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेच्या वेळी तिकीट का नाही दिले? त्यांना उमेदवारी देऊन त्यांचा मान-सन्मान राखायला हवा होता.

आपल्या सोईनुसार राऊत कसेही बोलत आहेत. तसे पाहिले तर सातार्यात सेना कधी राहिलेलीच नाही आणि आजपर्यंत कधी नव्हती. आणि अशा परिस्थिती कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होण्यासाठी काहीतरी भडक असे बोलायचे काम राऊत करत आहे त्याला काहीही अर्थ नसल्याचे शिवेंद्रराजे यांनी म्हंटले.

संजय राऊत काय म्हणाले?

काल साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात खा.संजय राऊत यांनी आ. शिवेंद्रराजे आणि छत्रपती घराण्यावर टीका केली. यावेळी राऊत म्हणाले की, प्रतापसिंह महाराजांनी इंग्रजांविरोधात स्वाभिमानासाठी त्याग केला. मात्र, त्यांच्या वंशजांनी भाजपासोबत तडजोड केली हे इतिहासाला मान्य होणार नाही. ज्या भाजप पक्षात शिवेंद्रराजे आहेत त्यांना छत्रपती घरण्याबद्दल आदर नाही. हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते आता पंत नेमणुका करायला लागले आहेत, अशी खोचक टीका राऊत यांनी यावेळी केली.