चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात खुप फरक आहे ; सामानाच्या अग्रलेखातून टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।पुण्यातील पुजा चव्हाण या मुलीचा गूढ मृत्यू हे खरंच चिंताजनक प्रकरण आहे.विरोधी पक्षाला याची चिंता वाटणे स्वाभाविकच आहे.पण हीच चिंता माजी खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूबाबत का वाटू नये,असा सवाल करत “चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात खूप फरक आहे”, असे सांगत आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजपवर चांगलीच टीका केली आहे.

सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होतं जात असल्याचे सध्या अनुभवायला मिळते आहे.आजच्या सामनाच्या अग्रलेखात तर भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अक्षरशः टीकेची झोड उठवली आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की “राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी वगैरे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आता हे वादळ होणार म्हणजे नक्की काय होणार? नुसता गडगडाट होणार की मुसळधार असे काही घडणार? सध्याच्या काळात विधिमंडळात वादळ याचा अर्थ विरोधक सभागृहात गोंधळ घालणार, विधानसभा अध्यक्षांच्या समोर येऊन घोषणाबाजी करणार, सरकारविरोधात आरोळय़ा ठोकणार, असा होतो. हेच वादळ असेल तर अशा वादळांची सरकारला आता सवय झाली आहे.

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, असा शड्डू विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ठोकला होता (वनमंत्री राठोड यांनी राजीनामाच दिल्याने हे शड्डू आता पोकळच ठरले आहेत). अर्थात या प्रकारची भाषा विरोधी पक्षनेत्यांच्या तोंडी शोभत नाही व त्यामुळे वादळ वगैरे निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही. पुण्यातील पूजा चव्हाण यांचे प्रकरण नक्कीच गूढ आणि चिंताजनक आहे. विरोधी पक्षाला तिच्या मृत्यूची चिंता वाटणे स्वाभाविक आहे, पण चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात फरक आहे. अशी चिंता मग राज्यातील प्रत्येक संशयास्पद मृत्यूप्रकरणी वाटायला हवी. दादरा-नगर हवेलीचे लोकप्रिय खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन गूढ पद्धतीने आत्महत्या केली. आपण का आत्महत्या करत आहोत? आपल्या आत्महत्येस जबाबदार कोण? हे सर्व त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवले. त्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांचा उल्लेख आहे, पण मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत भाजपच्या मंडळींना काहीच वाटत नाही.

एकीकडे सल्ला देत दुसरीकडे प्रश्न विचारत खास आपल्या ठाकरी शैलीत सामनातून भाजपवर टीका केली जाते आहे.आता भाजपकडून यावर काय उत्तर दिले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like