मुंबई । देशात फैलावत असलेल्या करोना विषाणूचं संकट आणि लॉकडाऊनवर चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली. पंतप्रधानांसोबत या बैठकीत काँग्रेससहीत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सरकारद्वारे करोना संकटाशी दोन हात करण्यासाठी सुरू असलेल्या कार्यांची माहिती दिली तसंच इतर नेत्यांकडूनही सूचना घेतल्या. दरम्यान या बैठकीत सेना-राष्ट्रवादीनं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वर्तन शिष्टाचाराला सोडून असल्याची तक्रार मोदींकडे केली. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना संजय राऊत यांनी राज्यपालांच्या वर्तनाबाबत मोदींच्या कानावर टाकल्याचं त्यांनी सांगितलं.
कोरोनाच्या संकटात राज्यात समांतर सरकार चालवण्याचा प्रयन्त राज्यपाल करत असल्याची तक्रार आपण मोदींना केली असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या सूचनांचं पालन करत राज्यातील प्रशासनाला दिशानिर्देश देत आहेत. अशा परिस्थतीत राज्याच्या राजभवनातून जर वेगळ्या हालचाली, समांतर सरकार चालवण्याचा प्रयन्त होत असेल तर हे दुर्दैवी आहे असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. राजभवनातून परस्पर अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेणं त्यांना आदेश देणं यामुळं निर्णय प्रक्रियेचे दोन केंद्र राज्यात निर्माण होत असून प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळं कोणाचे आदेश पाळावे असा संभ्रम अधिकारी वर्गात, प्रशासनात निर्माण झाला आहे. राज्यपालांना जर काही माहिती हवी असेल त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून ती घ्यावी असा शिष्टचार आहे. मात्र, राज्यपाल शिष्टाचार सोडून काम करत आहेत असं संजय राऊत यांनी सांगितलं.
देशातील सर्व राज्य सरकारं करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी झुंजत असताना काही राज्यांत राज्यपालांकडून अधिकाऱ्यांना परस्पर आदेश दिले जात आहेत. त्यामुळं समन्वय राखण्यात अडचणी येऊ शकतात. केंद्र सरकारनं याबाबत योग्य ती काळजी घ्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं व्यक्त केली. काही राज्यांमध्ये माननीय राज्यपालांकडून कार्यकारी वर्गाला थेट सूचना दिल्या जात आहेत. राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार राज्यपाल महोदयांना आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. मात्र, मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत त्यांनी ते अधिकार वापरल्यास ते योग्य राहील. त्यामुळं राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसंच, समन्वयामध्ये त्रुटी राहणार नाहीत, असं पवारांनी यावेळी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”