हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने आतातरी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. अन्यथा विरोधी पक्षांचा खोटेपणा रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल. असा स्पष्ट मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून मांडले. तसेच सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते, असे राऊत यांनी सांगितले.
“महाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षाच्या हातात गेले आहे काय, अशी शंका आता येत आहे. ३६ दिवसांत महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला व आणखी एक मंत्री घरी जातील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला तो नैतिकतेच्या मुद्द्यांवर, पण फडणवीस सरकारच्या काळात १४ मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेने सत्तेशी जणू ‘लव्ह जिहाद’ पुकारला होता,” असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना ‘रोखठोक’ टोला लगावला.
आज भ्रष्टाचार कोठे नाही? असा प्रश्न पडतो. विरोधी पक्ष तर ऊठसूट भ्रष्टाचाराचे आरोप राज्यकर्त्यांवर करीत असतो. केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महाराष्ट्रातले बिगर भाजप सरकार त्यांच्या डोळय़ात खुपते आहे. त्यामुळे मंत्र्यांना सरसकट बदनाम करा हे त्यांचे धोरण आहे. १०० कोटींच्या वसुलीचा आरोप पदावरून हटवलेला एक माजी पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांवर करतो व त्या आरोपावर आपली न्याय व्यवस्था सरळ ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश देते. म्हणजे महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणाचा तपास राज्याबाहेर न्यायचा व सरकारच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवायची.
महाराष्ट्रातच एखाद्या निवृत्त हायकोर्ट जजकडूनही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करता आला असता, पण महाराष्ट्रात हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआयला आणले गेले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचा तपास सीबीआयने १५ दिवसांत करायचा आहे व अहवाल हायकोर्टालाच द्यायचा आहे. मग आता याच पद्धतीने देशभरातील इतर आरोपांचा तपासही करणार काय? हा प्रश्न आहे, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन केले. वळसे-पाटलांनी गृहखात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हटले होते की, पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठा नक्की कोठे आहेत, हे तपासून घ्यावे लागेल. हे फक्त विधी, न्याय आणि गृहखात्यापुरते नाही, तर संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page