मुंबईचे महत्त्व कमी केलं, प्रकल्प पळवले तरी मोदींचे स्वागत असो; सामनातून चिमटे

Sanjay Raut Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत येणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर मोदी प्रथमच मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार असून यावेळी ते मुंबईतील अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. मुंबईत मोदींची जाहीर सभाही होणार आहे. या सर्व घडामोडींवरून शिवसेनेनं (Shivsena) सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मुंबईत ज्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण वगैरे करणार आहेत, त्यातील बहुसंख्य प्रकल्प पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाच पुढे सरकले. काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

पंतप्रधान मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवतरत आहेत हा प्रचार खोटा आहे. ते त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी व मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय? या भविष्यातील विचाराने येत आहेत. नव्हे. पंतप्रधानांना त्याच हेतूने मुंबईस बोलावले आहे. पंतप्रधानांच्या शुभहस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन वगैरे कार्यक्रम आयोजित केले आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपने मुंबई नगरी त्यांच्या झेंडयाने सजवली आहे. त्यात कोठे तरी मिंधे गटाने त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण मगरीने बेडूक गिळावा तसा हा गट गिळला गेला आहे व मगरीच्या जबडयात जाताना बेडूक अखेरचे डराव डराव करीत आहे असेच चित्र दिसत आहे असं म्हणत शिवसेनेने शिंदे गटावर टीका केली आहे.

पंतप्रधान मुंबईत ज्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण वगैरे करणार आहेत, त्यातील बहुसंख्य प्रकल्प पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाच पुढे सरकले. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या नागरी कामांचेच उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येत आहेत. भारतीय जनता पक्षाने या कामाचे श्रेय भलेही घेण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला सर्व काही माहीत आहे. पंतप्रधानांना मुंबईत महापालिकेच्या कामांचे लोकार्पण करण्यासाठी आणले ते महापालिका निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी, काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार, पंतप्रधान येतील व मुंबईचा कायापालट करतील असे जाहीर केले. मुंबईचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व कमी करून हा कायापालट केंद्राने सुरूच केला आहे. त्यामुळे आता नवे काय करणार? महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटीचे प्रकल्प पळवून नेले. हा मुंबईवर आर्थिक आघात आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेला, यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय असे म्हणायचे आहे काय? असा थेट सवाल शिवसेनेनं केला.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी गर्दी करण्याचे नियोजन आहे व येणाऱ्यांच्या गाडया घोड्यांच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून कलिना। येथील मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंतच तोडण्यात आली. त्यावरून वाद निर्माण झाला. मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत तोडून झाली. मुंबईतील एका एका प्रमुख वास्तूवर असे हातोडे चालले जात आहेत. तरीही आमच्या पंतप्रधानांचे स्वागत असो! आहेच!! असा चिमटाही सामनातून काढण्यात आला.