राममंदिरात शिवसेनेचे योगदान विचारणारी अवलाद शुद्ध हिंदू असू शकत नाही; सामनातून घणाघात

sanjay raut devendra fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राममंदिराच्या (Ram Mandir) लढ्यानंतर मुंबईत भडकलेल्या दंगलीत हिंदूचे रक्षण करणाऱ्या शिवसेनेचे (Shivsena) राममदिरात योगदान काय? असे विचारणारी अवलाद शुद्ध हिंदू असू शकत नाही. बाबरीचे घुमट कोसळत असताना जे पलायनवादी झाले तेच आज हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत व हे ढोंग पाहून गंगा, यमुना, गोदावरी, शरयूचे पात्रही स्तब्ध झाले आहे. जे लोक अयोध्येचा लढा सुरू असताना, शिवसैनिक बाबरीवर निर्णायक घाव घालत असताना मैदान सोडून पळून गेले ते रणछोडदास आता ‘हिंमत दाखवा’ वगैरे आव आणतात तेव्हा आश्चर्य वाटते असे म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल आहे?

अयोद्धेतील राममंदिराचे राजकारण भाजपने अत्यंत विकृत वळणावर नेऊन ठेवले आहे. ते आपल्या संस्कृतीस शोभणारे नाही. हिंदुत्वाची ठेकेदारी आपल्याकडेच आहे व राममंदिराच्या सातबाऱ्यावर जणू आपलेच नाव लागले आहे, अशा थाटात भाजपचे लोक वावरत आहेत. पण राममंदिर उभे राहात असताना ‘रामराज्य’ मात्र रसातळाला गेल्याचे स्पष्ट दिसते. अगदी महाराष्ट्राचेच बोलावे तर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्याही अश्रूनी भिजल्या आहेत. एका यवतमाळ जिल्हय़ातच 48 तासांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पश्चिम विदर्भात वर्षभरात सव्वा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे निघृण राज्य करणारे लोक श्रीराम मंदिर सोहळ्याच्या राजकीय घटानाद करीत फिरत आहेत.

विदर्भात शेतकऱ्यांच्या आयुष्याचे स्मशान झाले व तिकडे कश्मीर खोऱ्यात जवानांच्या चिता पेटल्या आहेत, पण इकडे डॉ. फडणवीस वगैरे लोक पिचक्या मांडीवर थाप मारून सांगत आहेत, ‘राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान काय? हिंमत असेल तर अयोध्येत या, तुमच्या छाताडावर मंदिर उभे केले आहे.’ राम म्हणजे संयम. राम म्हणजे सुस्वभाव, पण या लोकांनी संयमाची ऐशीतैशीच करून टाकली. जे लोक अयोध्येचा लढा सुरू असताना, शिवसैनिक बाबरीवर निर्णायक घाव घालत असताना मैदान सोडून पळून गेले ते रणछोडदास आता ‘हिंमत दाखवा’ वगैरे आव आणतात तेव्हा आश्चर्य वाटते. राममंदिर तुमची खासगी संपत्ती आहे काय? असा प्रश्न विचारताच फडणवीस वगैरे लोकांना ‘मिरची’ लागायचे कारण नव्हते, पण प्रश्न खरा व झणझणीत असल्याने त्यांना झोंबला. प्रभू श्रीरामाचे बोट धरून विष्णूचे तेरावे (भाजप कृत) अवतार मोदी हे राममंदिरात निघाले आहेत अशी पोस्टरबाजी हिंदूंना मान्य नाही. श्री. मोदी हे रामापेक्षा मोठे झाले काय? असे पोस्टर दुसन्या कोणी छापले असले तर ‘हिंदुत्वाचा अपमान झाला होss’ अशा आरोळ्या ठोकत भाजपने रस्त्यांवर घंटानाद व थाळीवादन केले असते असं म्हणत ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला.

राममंदिरासाठी शेकडो करसेवकाचे बलिदान झाले आहे व अनेक अज्ञात करसेवक शरयूच्या तळाशी छातीवर गोळ्या झेलून तपस्येला बसले आहेत. त्याचे काही योगदान हे लोक मानणार आहेत की नाही? लालकृष्ण आडवाणी यांनी श्रीराम मंदिरासाठी अयोध्या रथयात्रा काढली नसती व त्यांनी पेटवलेल्या अग्नीत अशोक सिंघल, विनय कटियार, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षमय समिधा टाकल्या नसत्या तर आजचे राममंदिर उभे राहिले नसते, पण भाजपला त्यांचे विस्मरण झाले. राममंदिर उभे राहात आहे हे आनंदाचे गाणे आहे व संपूर्ण देश ते गाणे गात आहे. राम अहंकारी नव्हता, पण मंदिर उ‌द्घाटन करणारे अहकारी व ढोगी आहेत. श्रीरामानें पिताश्री दशरथाचा सन्मान राखला व वनवास पत्करला. इथे पिताश्री आडवाणी यांनाच वनवासी करून अयोध्येचा सात- बारा आपल्या नावावर करून घेतला जात आहे. असं म्हणत सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आलाय.

रामचरित्र मानस म्हणजे भाजपची जुमलेबाजी नाही व अयोध्या म्हणजे अदानीची प्रॉपर्टी नाही. राममंदिराचा उदघाटन सोहळा हे पवित्र मंगलमय कार्य आहे. मात्र भाजपने राजकीय चिखल निर्माण करून त्याचे मांगल्य व पावित्र्यच सपवले. ही विकृतीच म्हणावी लागेल अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे.