हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक उत्सव म्हणजे वारी होय. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठुरायाचे भक्त त्याच्या भेटीच्या ओढीने त्याला भेटायला पायी जातात. कोणताच भेदभाव न ठेवता समानतेचे, एकतेचे आणि बंधुतेचे सूत्र जपत एकमेकांना सहकार्य करत भाविक आपल्या माऊलीला भेटायला जात असतात. गेली अनेक वर्षे ही वारीची परंपरा सुरु असल्याचे सांगितले जाते. १३ व्या शतकात संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांनी ही चळवळ सुरु केली असली तरी नामदेवांचे वडील वारीला जात होते असा संदर्भ पुराणांमध्ये आढळतो. तर दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारी वारीला यावर्षी लाखो भाविकांना मुकावे लागणार आहे. कोरोनामुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशावेळी घरी बसून वारी कशी करावी याबद्दल कीर्तनकार संजय नाना धोंडगे यांनी सांगितले आहे.
मन स्थिर ठेवण्याचा वारी हे उत्तम माध्यम असल्याचे ते सांगतात. राग, लोभ, मत्सर विसरून परमेश्वराशी एकरूप होता होता आपण अंतर्ध्यान होतो. आणि सर्व विकार झडून पडतात. वारीत एकदा गेलेला माणूस दरवर्षी नित्याने वारीला जातोच. असेही ते म्हणाले. पण आता संचारबंदीमुळे आपल्याला वारी करता येणार नाही आहे. पण म्हणून निराश होण्याचे कारण नाही असे ते सांगतात. यातून चांगला मार्ग काढून घरी बसून मानसिक वारी करावी असे ते सांगतात. घरी बसून वारीचे चिंतन केल्यास नक्कीच वारीची अनुभूती घेता येईल. वारीतील सर्व गोष्टींचे चिंतन करावे, हरिपाठ, भजन, समाजारती, संतवाङ्मयाचे चिंतन केले पाहिजे असे ते सांगतात.
कोरोना काळात पांडुरंग आपल्या सोबतच आहे हे भाव ठेवून मानसिक वारी केली तर तो आपल्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले. सोबतच घरी राहून नियमांची वारी करणेही गरजेचे आहे असेही ते म्हणाले. कोरोनामुळे वारी रद्द झाली असली तरी सर्व संतांच्या पालख्या या वाहनातून नेल्या जाणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.