उस्मानाबाद प्रतिनिधी | अलीकडच्या काळात स्त्री जन्माच्या स्वागताची प्रथा रूढ झाली आहे. वंशाचा दिवा म्हणुन मुलाच्या जन्माचेही मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. आधुनिक युगात नव्याने जन्मलेल्या बाळांचे नामकरण आगळ्या – वेगळ्या स्वरुपाचे असते. उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी मुलाचे “राष्ट्रपती” असे नामकरण केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
ग्रामीण भागात बाळांच्या नामकरणाचा पाळणा सोहळा करण्याची प्रथा जुनी आहे. पारंपारिक पद्धतीने महिला बाळाच्या कानात फुंकर मारुन नाव ठेवले जाते. देव – देवतांचे नाव ठेवण्याची प्रथा अजुनही आहे. अलीकडच्या काळात मात्र राजकीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचे नाव बाळाला देण्यात येत आहे. पणजोबा, आजोबा, आजीचे नाव वाढवण्यासाठी प्रथाही अजुन आहे.
दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील चिंचोली येथील बी. कॉम., डी.एड. झालेले दत्ता चौधरी सुशिक्षित बेरोजगार आहेत. संघटनेच्या माध्यमातुन सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र हा मार्ग कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा नसल्याने गावातच शिकवणी वर्ग सुरू केले. श्री. दत्ता चौधरी आणि कविता दत्ता चौधरी यांच्या कुटुंबात १९ जून २०२० रोजी पुत्ररत्न आला. पुत्ररत्नाचा उत्साह कुटुंबात होता, त्याच्या नामकरणाची वेळ आली. महिलांनी पहिल्यांदा देव – देवताच्या नावाची फुंकर मारली. श्री. चौधरी यांनी मात्र कल्पकतेने मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवण्याचा निर्णय घेतला.
जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर महानगरपालिकेतुन राष्ट्रपती दत्ता चौधरी या नावाने जन्मप्रमाणपत्र घेतले. त्यानंतर नुकतेच या नावाचे आधारकार्डही काढून घेतले आहे. दरम्यान राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. त्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. या पदाबाबत मोठी आस्था असल्याने कुटुंबातही राष्ट्रपती असावा अशी भोळी संकल्पना असावी म्हणूनच मुलाचे नामकरण राष्ट्रपती केले असावे.
मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवल्याने भविष्यात त्यांचा मुलगा राष्ट्रपती होईल असा विश्वास त्याचा वडिलांना वाटतो. तर येत्या काळात दुसरं आपत्य मुलगा झाला तर पंतप्रधान आणि मुलगी झाली तर प्रधानमंत्री ठेवण्याचा संकल्प केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.