“सिलेक्टिव्ह कारवाई करायची असेल तर चालू देणार नाही”; सुप्रिया सुळेंचा पंतप्रधानांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्या वतीने राज्यात सध्या अनेकांवर कारवाई केली जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “पंतप्रधान मोदी यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचे मी स्वागतच करते, मात्र, मोजक्याच लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरोधात कारवाई करायची असेल तर याला आम्ही साथ देणार नाही आणि हे चालूही देणार नाही,” असा इशारा सुळे यांनी पंतप्रधान मोदींना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या की, ईडीची धाड टाकायची असेल तर सगळ्याच पक्षांवर करावी. भाजपाच्या विरोधातील लोकांवर आरोप केले जातात. हेच लोक भाजपात आले की त्यांच्यावरील आरोप विरघळतात, हे असे का होते?. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी योग्य असावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचं मी स्वागत करते, पण असं सिलेक्टिव्ह लोकांविरोधात कारवाई करायची असेल तर याला आम्ही साथ देणार नाही.

पंतप्रधानांना या सर्व प्रकाराबद्दल अत्यंत विनम्रपणे याविषयीचा प्रश्न विचारणार आहे. नवाब मलिक म्हणत होते, त्याप्रमाणेच हा सगळा फर्जीवाडा आहे. कुणावर टीका करेपर्यंत अनेक नेते या ठिकाणी क्लीन असतात. पण कुणी विरोधात बोलले की त्यावर कारवाया होतात, अशी सगळी गंमत आहे, असे सुळे यांनी यावेळी सांगितले.

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई प्रकरणी आपण ठाकरे कुटुंबाला पूर्णपणे मदत करणार आहे. कारण ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचे 55 वर्षांचे ऋणानुबंध आहे. बाळासाहेब आणि पवार साहेबांचेही मैत्री आणि आदराचे संबंध आहेत. पुढील 100 वर्षेही राहतील. कोणाच्याही घरात अन्याय होतो, तेव्हा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि यापुढेही असतील, असेही खासदार सुळे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment