मुंबई । राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा मिनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चा केल्या जात होत्या. याबाबत टास्क फोर्सचे तज्ज्ञ यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक झाली. सदर बैठकीत महत्वाची चर्चा करण्यात आली आहे. राज्यात तुर्तास मिनी लॉकडाऊन न लावता त्या ऐवजी निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी केली जाऊ शकते.
मुंबईत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत टास्क फोर्स तज्ज्ञ आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत मिनी लॉकडाऊन लावण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊनचा पर्याय निकालात निघाल्याने राज्यातील नोकरदार, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकत असल्यामुळे राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
चोवीस तासात 18 हजार 466 नव्या कोरोना रुग्णांची नोंद –
दरम्यान सध्या मुंबईसह राज्यभरात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा सवाल उपस्थित होत होता. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 18 हजार 466 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून तर 20 जणांचा मृ्त्यू झाला.