हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी तब्बल 55 वर्षाचे पक्षांसोबतचे नाते तोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचे कौतुक केलं होते. याच वरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून देवरा यांच्यावर घणाघात केला आहे. मिलिंद देवरा यांच्या रूपाने मिंधेना दिल्लीत एक पटेल मिळाला आणि देवरा यांना नवे व्हिजन मिळाले असं म्हणत सामनातून निशाणा साधण्यात आला आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल आहे?
देवरा कुटुंबाने राजकारणात सर्वोच्च पदे भोगली ती फक्त काँग्रेसमुळेच…. त्याच काँग्रेसला सोडून ते आता मिंधे गटात दाखल झाले आहेत. २ वेळा दक्षिण मुंबईतून लोकसभा हरलेले मिलिंद देवरा यांची यावेळी सुद्धा लोकसभा लढायची इच्छा होती. त्या जागेवर शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत. त्यामुळे सध्याच्या महाआघाडीत या जागेवर काँग्रेसला लढता येणे शक्य नव्हते. देवरा यांनी या जागेसाठी आग्रह धरला व शेवटी 50 वर्षांचे नाते तोडून ते मिंधेवासी झाले. यामुळे काँग्रेसशी निष्ठा वाहिलेल्या त्यांच्या पिताजिंच्या म्हणजे मुरली देवरा यांच्या आत्म्यास यातना झाल्या असतील असं सामनातून म्हंटल
.
मिलिंद देवरा म्हणतात, ”एकनाथ शिंदें यांचे व्हिजन खूपच मोठे आहे. पंतप्रधान मोदी व शहा यांचेही देशासाठीचे व्हिजन मोठे आहे. मोदीविरोध हाच काँग्रेसचा कार्यक्रम आहे. तो मला मान्य नाही.’ तर काँग्रेसचा त्याग करताना मिलिंद देवरा यांनी त्यांचे व्हिजन स्पष्ट केले. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत देशात काहीच केले नाही व काँग्रेसला व्हिजन नव्हते व नाही हे त्यांचे म्हणणे आहे. पण या व्हिजन नसलेल्या पक्षानेच माधवराव शिंदे, मुरली देवरा अशांचे नेतृत्व उभे करून त्यांना सत्तेत आणले. आज ज्योतिरादित्य शिंदेही भाजपात गेले व मिलिंदभाई थेट मिंधे गटात गेले. फक्त दीडेक वर्षांपूर्वी शिवसेना फुटीतून, खोक्यांच्या माध्यमातून जन्मास आलेल्या मिंधे गटास व्हिजन आहे असा साक्षात्कार मिलिंद देवरा यांना झाला. मिंधे गटाने महाराष्ट्राची जी लूटमार चालवली आहे तेच व्हिजन असेल तर काय करावे?” असा सवाल करत सामनातून देवरा यांच्यासह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्यात आला.
मिलिंद देवरा यांना कोणताही खास जनाधार नाही. उद्योगपतींच्या वर्तुळात त्यांचा वावर आहे. मिंधे गटास दिल्लीत त्याकामी एक ‘दूत’ मिळाला व देवरा यांना फार तर मिंधे गटाचे दिल्लीतील ‘दूत’ म्हणून काम मिळेल. बदल्यात राज्यसभा मिळेल. उद्योगपतींच्या मध्यस्थीनेच देवरा मिंधे गटात पोहोचले. मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले व देवरांना नवे व्हिजन मिळाले. यात राष्ट्रकारण व समाजकारण अजिबात नाही. महाराष्ट्राच्या हिताचा तर विषयच नाही अशी टीका करत ठाकरे गटाने सामनातून हल्लाबोल केला आहे.