हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. जगात स्वस्ताई भारतात मात्र महागाई या मथळ्याखाली ठाकरे गटाकडून केंद्र सरकारचे वाभाडे काढण्यात आले आहेत. जगात अनेक वस्तू स्वस्त होऊनही आपल्याकडे महागच झाल्या आहेत. ‘मोदीनॉमिक्स’ चे ढोल जगभर पिटणारा सत्ताधारी पक्ष आणि अंधभक्त यांचे या ‘जगात स्वस्ताई, भारतात महागाई या उफराट्या समीकरणावर काय म्हणणे आहे? महागाईचा असाही ‘चमत्कार’ फक्त मोदीच करू शकतात असेच कदाचित ते म्हणतील आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतील असा टोलाही सामनातून लगावण्यात आला.
महागाई कमी झाल्याचे ढोल सत्ताधारी मंडळी येता-जाता पिटत असतात. त्यासाठी कधी कागदी घोडे तर कधी कागदोपत्री आकडे नाचवीत असतात. अर्थात महागाईसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या मात्र सत्ताधाऱ्यांचे ढोल फोडणाऱ्या आणि कागदी घोडयांना लगाम घालणाऱ्या आहेत. आता तर एका बातमीने महागाई कमी झाल्याच्या दाव्याची पोलखोलच केली आहे. ‘जगात महागाई कमी झाली असली तरी भारतात मात्र ती वाढली आहे,’ अशी ही बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या हवाल्याने दिलेल्या या बातमीत असे म्हटले आहे की, जानेवारीमध्ये जागतिक बाजारात महागाई दर कमी झाला असला तरी भारतात मात्र तो वाढला आहे. आता यावर केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे काय म्हणणे आहे, हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही.
गॅस, खाद्यतेल, कापूस, कॉफी चहा आदी रोजच्या जीवनात आवश्यक 10 पदार्थांचे भाव दुपटीने वाढले आहेत. खतांच्या किमतीही दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे आधीच निसर्गाच्या लहरीने हवालदिल झालेल्या बळीराजाचे बजेट कोलमडले आहे. वास्तविक, या सर्व वस्तूंचे दर जागतिक बाजारात थोडेथोडके नाही, तर तब्बल 48 टक्क्यांनी कमी झाले आहेत आणि भारतात काय स्थिती आहे? तर आपल्याकडे हे भाव दुप्पट झाले आहेत.
युरिया हे खत शेती आणि शेतकयांसाठी एक अत्यावश्यक गोष्ट. त्याचे भाव जगात 47.6 टक्क्यांनी कमी झाले. भारतात मात्र ते 5.2 टक्क्यांनी वाढले आहेत. तीच गोष्ट नैसर्गिक गॅसची. जगात नैसर्गिक गॅस 28.6 टक्के स्वस्त झाला असताना भारतात मात्र थेट 95 टक्के महागला आहे. हे असे कसे घडू शकते? काही कारणांमुळे जागतिक किमती आणि भारतातील किमती यांच्यात काही फरक राहू शकतो, परंतु नैसर्गिक गॅस जगात स्वस्त झाला असताना भारतात 95 टक्के महाग कसा काय होऊ शकतो? त्याचे ‘अपश्रेय’ मोदी सरकारनेच घेतले पाहिजे अशी टीका सामनातून करण्यात आली.
पेट्रोल-डिझेलबाबत तरी वेगळी काय स्थिती आहे? जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या तरी आपल्या देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढच होत असते. स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर ‘एक हजारी मनसबदार’ बनते तर पेट्रोल-डिझेल ‘शंभरी’ पार करते! मुळात देशांतर्गत इंधन दर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार कमी-जास्त होणे अपेक्षित आहे. मात्र मोदी सरकारच्या काळात हे ‘समीकरण’ ही खुंटीला टांगून ठेवले गेले आहे. विशेषतः गेल्या दोन-तीन वर्षांत जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमती कमी होऊनही त्याचा काहीच फायदा आपल्या देशातील सर्वसामान्यांच्या पदरात पडला नाही असं म्हणत ठाकरे गटाने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.