नवी दिल्ली । बंडखोरी करून राजस्थानातील गहलोत सरकार अडचणीत आणणारे काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांना काँग्रेस पक्ष गमावू इच्छित नाही. त्यासाठी प्रियंका गांधी यांनी पक्षाचे जेष्ठ नेते अहमद पटेल आणि वेणुगोपाल यांना सचिन पायलट यांची समजूत काढण्याची कामगिरी सोपवली आहे. पायलट यांना पक्षात पुन्हा आणण्याचा हे नेते प्रयत्न करतील.
या अगोदरही प्रियंका गांधी वाड्रा यांनी सचिन पायलट यांच्यासोबत चर्चा केली होती, परंतु सचिन पायलट सहमत नव्हते. सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्याचा आता पुन्हा प्रयत्न सुरू आहे. प्रियंका यांनी गांधी घराण्यातील सर्वात जवळचे अहमद पटेल आणि संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना याबाबतची जबाबदारी दिली आहे. सचिन पायलट यांच्या गटातील आमदारांना फोन करून त्यांचीही मने वळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे सचिन पायलटसंदर्भात काँग्रेस हाय कमांडकडून मवाळ भूमिका घेण्यात येत आहे. राजस्थानचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे म्हणाले की, सचिन पायलटसाठी पक्षाचे दरवाजे बंद केलेले नाहीत. या व्यतिरिक्त अनेक पक्ष नेत्यांनी असे सांगितले की सचिन पायलटसाठी दरवाजे नेहमीच खुले असतात.
मात्र, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना आता सचिन पायलट यांना परत पक्षात घेण्याची इच्छा नाही. यामुळेच काल गेहलोत यांनी सचिन पायलटवर थेट हल्ला केला होता. ते म्हणाले होते की, स्वत: उपमुख्यमंत्रीच येथे डील करत होते. आणि ते आमच्या समोर स्पष्टीकरण देत होते. आज एजन्सीचे नाव घेऊन लोकांना त्रास दिला जात आहे. आम्हीही बर्याच काळापासून राजकारणात आहोत. पायलट यांच्यावर सीएम अशोक गेहलोत यांनी केलेल्या वैयक्तिक हल्ल्यामुळे काँग्रेस हायकमांड नाराज आहेत. सचिन पायलट यांना नोटीस पाठवल्यानंतर ही अशोक गेहलोत यांना याबाबत जाब विचारण्यात आला. आता प्रियंका गांधी वाड्रा यांच्या एन्ट्रीनंतर सचिन पायलट परतणार की नाही. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.