हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणपती किंवा गणेशोत्सव हा मराठी बांधवांसाठी विशेष जिव्हाळ्याचा सण. गणपती बसण्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात. खेड्या-पाड्यातील लोकांना एकत्र बांधून ठेवताना हा सण महत्वाची भूमिका पार पाडतो. यंदाच्या गणेशोत्सवावर मात्र कोरोनाचे सावट असल्याने अनेकांना गणरायांची प्रतिष्ठापना करण्यासंदर्भातील चिंता लागून राहिलेली आहे. अनेक ठिकाणी गुरुजी व्हिडिओ कॉलवरुन पूजा सांगणार आहेत. तर काहीजण घरी स्वत: गणरायांची प्रतिष्ठापना करणार आहेत. मात्र अनेकदा गणरायांची प्रतिष्ठापना शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करायची याबाबत पुरेशी माहिती नसते. यंदाच्या गणेशोत्सव काळात पूजन मुहूर्त काय आहेत याविषयी जाणून घेऊ थोडक्यात..!!
शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. मध्याहन गणेश पूजेचा मुहूर्त सकाळी ११ वाजून ०६ मिनिटांपासून दुपारी ०१ वाजून ४२ मिनिटांपर्यंत आहे. वर्जित चंद्र दर्शनाचा काळ सकाळी ०९ वाजून ०७ मिनिटांपासून ०९ वाजून २६ मिनिटांपर्यंत आहे. चतुर्थी तिथिचा आरंभ २१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ०२ मिनिटांपासून सुरु होईल तर चतुर्थी तिथी समाप्तीचा कालावधी २२ ऑगस्ट शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ५७ मिनिट असेल.
यंदाच्या गणेशोत्सवाला परवानगी मिळतेय की नाही इथुन द्विधा मनस्थिती असलेल्या गणेश भक्तांनी परवानगी मिळाल्यानंतर सामाजिक भान जपत गणेशोत्सव साजरा करायचं ठरवलं आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी बाकी खर्चाला फाटा देत रक्तदान, प्लाझ्मा दान, गरीब कुटुंबांना मदत, पूरग्रस्तांना मदत हे उपक्रम हाती घेतले आहेत. लॉकडाऊन काळात झालेलं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी अनेक लोकांनी गणेश मूर्ती विक्री, सजावट साहित्य विक्री यांसारखे छोटेखानी उद्योग सुरु केले असून मागील १५ दिवस अपेक्षित उलाढाल झाली नसली तरी शनिवारी चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता दुकानदारांनीही वर्तवली आहे.
यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षीत असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजपणा नसावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश दर्शनासाठी गर्दी होणार नाही. तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक शारिरीक अंतराचे, स्वच्छतेचे नियम त्यात मास्क, सॅनिटायझर वापरणे पाळतात याची खात्री मंडळाचे अध्यक्ष यांनी करावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाचे तसेच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.